Vidhan Sabha 2019 : जळगाव जिल्हा : ‘घरकुल’ निकालामुळे बदलणार राजकारण

सचिन जोशी
Friday, 27 September 2019

विकास हा मुद्दाच नाही
सुमारे पाच वर्षांपूर्वी सत्ताधारी भाजपने राज्यातील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. रस्त्यांची दुरवस्था, सिंचन प्रकल्प, कृषीविषयक धोरण, तत्कालीन सत्ताधारी आघाडीतील नेत्यांचा भ्रष्टाचार हे त्या वेळी प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते. या मुद्द्यांवरून रान पेटवत भाजपने सत्ता काबीज केली. मात्र, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, रस्त्यांची व्यथा कायम आहे. मेडिकल हबसारखा एखाद्‌ दुसरा प्रकल्पच काय तेवढी जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. गिरीश महाजनांच्या रूपाने जलसंपदासारखे महत्त्वाचे खाते असतानाही सिंचन प्रकल्पांना न्याय मिळू शकलेला नाही. आता तर हे मुद्दे कायम असताना प्रचारात ते येतील की नाही, ती शंकाच आहे.

विधानसभा 2019 : जिल्ह्यात एकीकडे काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीचे उमेदवार निश्‍चित असताना भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांचे युतीच्या फैसल्याकडे लक्ष आहे. आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार चालवलाय, तर भाजपमधील इच्छुकांमध्ये कमालीची रस्सीखेच आहे. घरकुल गैरव्यवहारात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह गुलाबराव देवकर, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनाही शिक्षा झाल्याने तीन मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर उमेदवारीचा पेच आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपात अकरापैकी तब्बल नऊ मतदारसंघ राष्ट्रवादीने स्वत:कडे घेतले आहेत. जळगाव आणि रावेर हे केवळ दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होतोय. या संतापामुळे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेत बंड पुकारले. मात्र, दोनच दिवसांत ते थंडावले. आघाडीचे जागावाटप होऊन दोन्हीही काँग्रेसचे बहुतांश उमेदवारही जवळपास निश्‍चित झालेत. जळगाव शहरातून काँग्रेसकडून डॉ. राधेश्‍याम चौधरींचे नाव आघाडीवर असून, रावेरमधून माजी आमदार शिरीष चौधरी यांचा प्रचारही सुरू झालाय. राष्ट्रवादीकडून एरंडोलचे आमदार डॉ. सतीश पाटील, चाळीसगावमधून माजी आमदार राजीव देशमुख, पाचोऱ्यातून माजी आमदार दिलीप वाघ, चोपड्यातून माजी आमदार जगदीश वळवी यांनी प्रचार सुरूही केलाय. मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारीचा आग्रह आहे. तेच उमेदवार असतील, असे मानले जाते. तर जामनेर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, भुसावळ या चार मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

भाजपात प्रचंड रस्सीखेच
राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजपकडे उमेदवारांची भाऊगर्दी आहे. जामनेरचा मात्र त्याला अपवाद आहे. चाळीसगावात तर तब्बल ३५ इच्छुकांनी मुलाखती दिल्यात. माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या मतदारसंघातूनही तीन-चार जण इच्छुक आहेत. भाजपने सर्व ११ मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या, तरी युती झाल्यानंतर तीन-चार मतदारसंघ शिवसेनेकडे जातील, असे मानले जाते. मुक्ताईनगरातून पुन्हा खडसे, जामनेरातून महाजन, जळगावातून सुरेश भोळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. अन्य मतदारसंघांत मात्र चुरस आहे. शिवसेनेनेही सर्व मतदारसंघांमधून लढतींची तयारी चालवली असली तरी युती होणार, असे सांगितले जात असताना त्या फैसल्याकडे शिवसेनेमधील इच्छुकांचे लक्ष आहे. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, पाचोऱ्यातून आमदार किशोर पाटील, पारोळ्यातून माजी आमदार चिमणराव पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते.

घरकुल गैरव्यवहाराची पार्श्‍वभूमी
गेल्याच महिन्यात जळगाव महापालिकेच्या गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षा झाली. हे तिघेही नेते सध्या कारागृहात आहेत, ते निवडणूक लढू शकत नाहीत. 

खडसे-महाजन दुरावलेलेच
भाजपातील दिग्गज एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामधील गटबाजी उघड आहे. खडसेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर दोघा नेत्यांमधील दरी अधिक रुंदावली आहे. आता निवडणूक समोर असल्याने गटबाजी, मतभेद बाजूला ठेवावे लागतील. पक्षश्रेष्ठींनी या निवडणुकीदरम्यानही खडसेंना डावलण्याची भूमिका कायम ठेवली, तर त्याचे परिणाम निकालावर दिसतील, असे मानले जाते.

दृष्टिक्षेपात...
खडसेंच्या उमेदवारीवर उलटसुलट चर्चा
घरकुल गैरव्यवहाराने बदलली समीकरणे
रखडलेले सिंचन प्रकल्प कळीचा मुद्दा
महामार्ग चौपदरीकरणाचे ठप्प कामही लक्ष्य
गिरीश महाजनांचा राहणार वरचष्मा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Jalgaon District Gharkul Result Politics