esakal | कोरोना रुग्णांबाबत वीज कंपनी बेफिकीर; हिरे महाविद्यालयाची खंत 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule hire hospital

कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांचा सर्वाधिक भार हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर आहे. सरासरी २७३ खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बेड शिल्लक नव्हत्या. त्यामुळे हा भार जिल्हा शासकीय रुग्णालय, इतर कोविड केअर सेंटरवर विभागून देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. 

कोरोना रुग्णांबाबत वीज कंपनी बेफिकीर; हिरे महाविद्यालयाची खंत 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : येथील चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा संसर्गजन्य कोरोना विषाणूशी अहोरात्र मुकाबला सुरू असताना वीज कंपनीचे अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची व्यवस्थापनाची खंत आहे. महाविद्यालयास या संकटकाळात एक्स्प्रेस फीडरची आवश्‍यकता आहे. मात्र, इंडस्ट्रिअल फीडरवरून महाविद्यालयास वीजपुरवठा होत असल्याने पावसासह इतर वेळी तो खंडित झाला तर त्याचा फटका कोविड कक्षाला बसतो. त्यामुळे आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना धोका संभवतो. 

कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांचा सर्वाधिक भार हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर आहे. सरासरी २७३ खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बेड शिल्लक नव्हत्या. त्यामुळे हा भार जिल्हा शासकीय रुग्णालय, इतर कोविड केअर सेंटरवर विभागून देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. 

व्हेंटिलेटरवर चौदा रुग्ण... 
 
हिरे महाविद्यालयात सद्यःस्थितीत ३२ पैकी १४ व्हेंटिलेटरवर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. असे असताना हिरे महाविद्यालयास सध्या वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. या महाविद्यालयासह रुग्णालयाला स्वतंत्र एक्स्प्रेस फीडरची आवश्‍यकता आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा मिळू शकेल, असे महाविद्यालय व्यवस्थापनास वाटते. मात्र, या महाविद्यालयासह रुग्णालयाचा वीजपुरवठा इंडस्ट्रिअल फीडरवरून होत आहे. त्यामुळे वादळी पाऊस आला, तसेच तांत्रिक कारणाने इतर काही वेळेस वीजपुरवठा खंडित झाला तर त्याचा हिरे महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला फटका बसतो. 
 
महाविद्यालयापुढील प्रश्‍न... 
 

महाविद्यालयाकडे जनित्राची सुविधा आहे. मात्र, अनपेक्षितपणे वीजपुरवठा खंडित झाला तर जनित्र सुरू होण्यास पाच ते सात मिनिटांचा अवधी लागतो. या वेळी या कालावधीत व्हेंटिलेटर अधिक काळ तग धरू शकत नाही. त्याला बॅटरी बॅकअप असला तरी तो फार काळ टिकत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर व्हेंटिलेटरवरील रुग्णांना धोका संभवतो. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होत असते. या स्थितीत वीजपुरवठा अहोरात्र सुरळीत असावा, अशी अपेक्षा आहे. 
 
जिल्हाधिकाऱ्यांचा खटाटोप... 
 

काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या वेळी महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, कुसुंबा-नेर (ता. धुळे) शिवारातील ऑक्सिजन सिलिंडरच्या प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनासह जिल्हाधिकाऱ्यांची झोप उडाली. त्यांनी खटाटोप केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. कोरोनाग्रस्त व काही संशयित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असते. या स्थितीवेळीच जिल्हाधिकाऱ्यांनीही वीज कंपनीला हिरे महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, ऑक्सिजन सिलिंडर प्रकल्पस्थळी अहोरात्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना दिली. ती अद्याप कंपनीने गांभीर्याने घेतलेली नाही, अशी खंत महाविद्यालय व्यवस्थापनाने मांडली. अशी बेफिकिरी कोरोनाग्रस्त रुग्णांना धोक्यात टाकणारी ठरली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न असेल. 

कंपनीशी वेळोवेळी पत्रव्यवहार... 

हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून रुग्णालय व्यवस्थापन, जिल्हाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, अशी सूचना दिली आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने कंपनीशी वेळोवेळी या मागणीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

प्रस्तावासह रीतसर पैसे भरावेत... 
 
या संदर्भात वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश पवनीकर म्हणाले, की हिरे महाविद्यालयासह संलग्न रुग्णालयाने एक्स्प्रेस फीडर पाहिजे असल्यास रीतसर प्रस्ताव सादर करून आवश्‍यक ते पैसे भरावेत. तोंडी सांगून उपयोग नाही. प्रस्ताव सादर असला की शासकीय नियमानुसार पुढील कार्यवाही करता येईल.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image