esakal | धुळे जिल्हा रूग्णालयातून दोनदा रुग्ण पसार...
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्हा रूग्णालयातून दोनदा रुग्ण पसार...

जिल्हा रुग्णालयात एका अपघातातील रुग्ण काही दिवसांपासून दाखल आहे. तो चाळीसगावचा आहे. तो संबंधित रुग्ण गुरुवारी दुपारी रुग्णालयातून पसार झाला.

धुळे जिल्हा रूग्णालयातून दोनदा रुग्ण पसार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे ः शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून गुरुवारी पसार झालेला प्रौढ रुग्ण रात्री रुग्णालयात परतला. मात्र, तो पुन्हा आज सकाळी रुग्णालयातून पसार झाला. त्यामुळे खळबळ उडाली.


तो रुग्ण रुग्णालयाच्या हिरव्या ड्रेसमध्ये आज दुपारी बारानंतर मालेगाव रोडवरील दसेरा मैदानाजवळ हिंडत असल्याचे दिसून आले. जिल्हा रुग्णालयातून यापूर्वीही चार ते पाच कोरोनाबाधित व कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केले आहे. 


यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला वेळोवेळी समज देऊनही असले प्रकार थांबलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयात एका अपघातातील रुग्ण काही दिवसांपासून दाखल आहे. तो चाळीसगावचा आहे. तो संबंधित रुग्ण गुरुवारी दुपारी रुग्णालयातून पसार झाला. तो थेट वाखारकरनगर परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ नागरिकांना दिसला. मदतीसाठी पोलिसांनाही बोलावण्यात आले. रुग्णालयाच्या ड्रेसमध्ये तो रुग्ण असल्यामुळे आणि तो कोरोनाबाधित असल्याच्या संशयामुळे त्याच्याजवळ कोणीही जायला धजावत नव्हते. ही माहिती जिल्हा रुग्णालयाला समजल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून आणत रुग्णालयात सायंकाळनंतर दाखल केले. रात्रभर तो रुग्ण मुक्कामी राहिला आणि सर्वोपचार रुग्णालयातून पुन्हा आज सकाळी पसार झाला. तो दुपारी बाराच्या सुमारास दसेरा मैदानाजवळ दिसून आला. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले, की संबंधित रुग्णाचे मानसिक संतुलन योग्य नसल्याचे दिसून येत असून, त्याविषयी डॉक्‍टरांना सूचना देऊन त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला जाईल. दसेरा मैदानाजवळ तो रुग्ण दिसून आल्याचे समजतातच रुग्णवाहिका पाठविली आहे. तो रुग्ण रुग्णालयातून दुसऱ्यांदा पसार झाला आहे. तो नाॅन कोविड रूग्ण आहे.
 

loading image
go to top