महिलेच्या पोटातून काढली तब्बल १० किलोची गाठ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

स्त्री रोग विभागातील डॉक्टर्सने तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटात डाव्या बाजूला वीस ते बावीस सेंटीमीटरची मोठी गाठ असल्याचे आढळले. 

धुळे : मोरदड येथील रहिवासी असलेली ४७ वर्षीय महिला पोट दुखत होते; म्हणून जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी भरती झाली. यावेळी स्त्री रोग विभागातील डॉक्टर्सने तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटात डाव्या बाजूला वीस ते बावीस सेंटीमीटरची मोठी गाठ असल्याचे आढळले. 

महिलेची आधीची तीन ऑपरेशन झालेली होती तसेच तिची हलाखीची परिस्थिती असल्याने दुसरीकडे ऑपरेशन होत नव्हते. दरम्यान जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. अमोल कोरान्ने आणि डॉ. नितीन कुलकर्णी यांनी कॉलेजचे अधिष्ठाता व संस्थाचालक यांच्याशी चर्चा करून मोफत ऑपरेशनसाठी परवानगी मिळवली. त्यानंतर भूलतज्ञ डॉ. मनोज कोल्हे व त्यांचे टीम यांच्या मदतीने गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. डॉक्टरांच्या टिमने ऑपरेशन करून जवळपास दहा किलोची गाठ व गर्भपिशवी काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे त्या महिलेच्या जिवास असलेला धोका टळला. शस्‍त्रक्रिया मोफत करण्यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगिता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर महिलेच्या जिवाचा धोका टळला असून आता तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती स्त्री रोग विभागातील डॉक्टरांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news 10 kg lump was removed from the woman's abdomen dhule medical collage