भाजपचे स्वप्न म्‍हणजे मुंगेरीलालसारखे : अब्‍दुल सत्‍तार

रमाकांत घोडराज
Sunday, 24 January 2021

राजकारणात सत्ता कोणतीही असो तिच्यासोबत सत्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे. भाजपच्या नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी दिलेला शब्द पाळला नाही आणि आजही ते खोटेच बोलत असल्याने त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली

धुळे : भाजपने दिलेली शब्‍द पाळला नाही; म्‍हणून त्‍यांना सत्‍ता गमवावी लागली. परंतु, आम्‍ही पुन्हा सत्‍तेत येणार असे भाजप नेत्‍यांना वाटतेय, त्यामुळे ते निराधार विधान करत आहेत. त्यांना सत्तेत येण्याचे स्वप्न पडत आहे. मात्र, त्यांचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने‘ सारखे आहे. ते कधीच सत्यात उतरणार नसल्‍याचा टोला पालकमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी भाजपला लगावला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे धुळे शहरात विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचा संकल्प मेळावा झाला. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री श्री. सत्तार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, महेश मिस्त्री, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे, गुलाब माळी, राजेश पटवारी, कविता क्षीरसागर आदी उपस्थित होते. श्री. सत्तार म्हणाले, की २००३ मध्ये धुळे महापालिकेत प्रथम महापौर शिवसेनेचा झाला. त्यावेळी भाजप नावालाच होती. गेल्या निवडणुकीत आपलाच विश्‍वासघात करून त्यांनी सत्ता मिळविली. मात्र, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवू. प्रत्येक शिवसैनिकाने खारीचा वाटा उचलला तरी महापालिकेत सत्तांतर होईल. 

५५ प्लसचा नारा 
महापालिकेत नावालाच असलेल्या भाजपने शिवसेनेचा हात धरून महापालिकेत प्रवेश केला व विश्‍वासघात करून सत्ता मिळविली. मात्र, येणाऱ्या निवडणूकीत भाजपला धडा शिकवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ५५ प्लस नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी शपथ घ्या महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेपासून दूर गेलेल्या जुन्या पदाधिकारी, शिवसैनिकांनाही त्यांनी पक्षात परत येण्याचे आवाहन केले. 

ताकद देण्यासाठी आलोय 
पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ताकद देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथे आलो आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तांडे, वस्त्यांवर शिवसेनेच्या शाखा स्थापन करा. ज्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन होईल त्यांना संपूर्ण मदतीचे आश्वासनही श्री. सत्तार यांनी दिले. मेळाव्यात शहरातील अनेक महिला, तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
 
भाजपचे स्वप्न मुंगेरीलालसारखे 
राजकारणात सत्ता कोणतीही असो तिच्यासोबत सत्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे. भाजपच्या नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी दिलेला शब्द पाळला नाही आणि आजही ते खोटेच बोलत असल्याने त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. सत्तेतून अचानक बाहेर गेल्यामुळे भाजपाचे नेते आता हँग झाले आहेत. त्यामुळे ते निराधार विधान करत आहेत. त्यांना सत्तेत येण्याचे स्वप्न पडू लागले आहेत मात्र, त्यांचे हे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने‘ सारखे आहे. ते कधीच सत्यात उतरणार नाही असा टोला श्री. सत्तार यांनी भाजपला लगावला. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news abdul sattar target bjp leader shiv sena melava