धुळ्यात रहिवास अतिक्रमणांचे ‘ड्रोन’ने सर्वेक्षण 

निखील सुर्यवंशी
Sunday, 20 December 2020

अतिक्रमित वस्ती, झोपडपट्टी भागातील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासह रहिवाशांचे आहे त्या जागेवरच पुनर्वसन करावे, त्यांना सातबारा द्यावा, असा राज्य शासनाचा आदेश आहे.

धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील फाशीपूल परिसरातील शाहीर अण्णा भाऊ साठे नगर भागात रहिवास अतिक्रमणांचे शनिवारी (ता. १९) ‘ड्रोन’ने सर्वेक्षण झाले. अतिक्रमणे नियमाकुलतेपूर्वी ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपचे पदाधिकारी गजेंद्र अंपळकर यांनी पुढाकार घेतला. 
अतिक्रमित वस्ती, झोपडपट्टी भागातील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासह रहिवाशांचे आहे त्या जागेवरच पुनर्वसन करावे, त्यांना सातबारा द्यावा, असा राज्य शासनाचा आदेश आहे. अशा भागात घरकुल योजनेचा लाभही दिला जावा, असे निर्देश आहेत. यासंदर्भात महापालिकेने वर्षापूर्वी महासभेत अंमलबजावणीचा ठराव केला. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. शासनाच्या निकषानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्यावर संबंधित अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळू शकेल. ड्रोनद्वारे मोजमापावेळी श्री. अंपळकर, पथकातील वास्तूतज्ज्ञ चेतन सोनार, जितेश सूर्यवंशी, रूपाली सूर्यवंशी, रोहित सोनार, मनोज चौधरी, अशरफ मोमीन, संजय गिरी, रवींद्र बोरसे, अजय पवार, अनिल रामराजे आदी उपस्थित होते. 

उपमहापौरांची भूमिका 
ड्रोनद्वारे साठेनगरमधील अतिक्रमित रहिवासाचे मोजमाप झाल्यावर सरासरी तीन महिन्यांनंतर नगरभूमापन कार्यालयातील मालमत्ता उताऱ्यावर अतिक्रमणधारकांचे नाव लागू शकेल, असे सांगत उपमहापौर कल्याणी अंपळकर, तसेच गजेंद्र अंपळकर म्हणाले, की प्रभाग चौदामधील प्रत्येक भागाचा चेहरामोहरा बदलायचा आहे. झोपडपट्टी भागाचे रूप पालटायचे आहे. साठेनगरमधील अतिक्रमण रहिवास नियमाकुलतेची प्रक्रिया पार पडल्यावर अनुदानित पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ अतिक्रमणधारकांना मिळवून दिला जाईल. त्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे सहकार्य लाभत आहे. साठेनगरमधील अतिक्रमण नियमाकुल होण्यासाठी चार महिन्यांपासून पाठपुरावा होत आहे. संबंधितांना सातबारा मिळवून देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती असून, त्यात महापालिका आयुक्त, भूमापन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निकषांची पूर्तता झाल्यावर साठेनगरमधील सरासरी दीडशे रहिवास अतिक्रमणधारकांना जागेचा उतारा मिळू शकेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news aerial drone survey in residencial aria