esakal | हजार कोटींच्या निधीतून धुळे- औरंगाबाद चौपदरीकरण

बोलून बातमी शोधा

dhule aurangabad highway

हजार कोटींच्या निधीतून धुळे- औरंगाबाद चौपदरीकरण

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : बहुप्रतिक्षीत धुळे- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरीकरणास केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. तो हजार कोटींच्या निधीतून साकारेल. तसेच आर्वी- कुळथे (ता. धुळे) मार्गावरील बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून चार कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

२०२०- २०२१ च्या सेंट्रल रोड ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (सीआयआरएफ) या कार्यक्रमातून आर्वी ते कुळथे मार्गावरील धाडरा- धाडरी गावाजवळ बोरी नदीवरील पुलासाठी सुमारे चार कोटी ७९ लाख ३२ हजाराचा निधी मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. या कामाची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी द्यावी, असे केंद्राने राज्य सरकारला सूचित केले आहे. आर्वी- धाडरे- कुळथे जिल्हा मार्ग क्रमांक ५१ वरील दगडी फरशी २०२० मध्ये तुटली. त्यामुळे आर्वीकडून धाडरा- धाडरी- कुळथे- होरपाडा-नंदाळे- बोरकुंड या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटला. ही स्थिती सुधारण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. आर्वी- धाडरे- कुळथे होरपाडा- बोरकुंडचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यात आला. मात्र, बोरी नदीचा पूल पूर्णपणे तुटल्यामुळे रस्त्याचा उपयोग कमी झाला. ही वस्तुस्थिती लक्षात घेत खासदार भामरे यांनी विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी डॉ. भामरे व मंत्री गडकरी यांचे आभार मानले.

चौपदरीकरणास मंजुरी

चार वर्षांपासून मंजुरी मिळूनही काम सुरू न झालेल्या धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. पाठपुराव्याला यश मिळून मंत्री गडकरी यांनी भारत माला परियोजनेत समावेश करीत या महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी दिली, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. त्यांनी मंत्री गडकरी यांचे आभार मानले. केंद्राच्या मंजुरीनंतरही या चौपदरीकरणास सुरवात होत नव्हती. त्यावेळी ठेकेदार कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे काम ठप्प झाले. जिल्हा विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी पटवून दिल्यानंतर प्रश्‍न मार्गी लागला. धुळे ते बोडरेपर्यंत (चाळीसगाव) ६७.२३ किलोमीटरचा चौपदरीकरण प्रकल्प एक हजार कोटींच्या निधीतून साकारेल. कामानंतर धुळे ते औरंगाबाद अंतर दोन तासात गाठता येईल, असेही डॉ. भामरे यांनी सांगितले.