esakal | ‘जैसे थे’ पडलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर
sakal

बोलून बातमी शोधा

student free books

‘जैसे थे’ पडलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : कोरोना लॉकडाउनमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्याच नाहीत. पाचवी ते आठवीचे वर्ग जेमतेम दोन महिने चाललेत. या विद्यार्थ्यांकडे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहेत. ही पाठ्यपुस्तके शाळा स्तरावर जमा करणे गरजेचे आहे. यांचा पुनर्वापर सहज शक्य आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार पुनर्वापरची अंमलबजावणी सहज शक्य आहे. याकडे गुरुजींनी आणि शिक्षण विभागाने गांभीर्याने बघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. ही पुस्तके दरवर्षी नव्याने दिली जात असतात. जुनी पुस्तके युज अँड थ्रो केली जातात.

थ्री आर संकल्पना

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तक पुनर्वापर योजना आणली आहे. यात गतवर्षाच्या गेल्या पाठ्यपुस्तकांची पुनर्वापर संकल्पना येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. यात थ्री आर संकल्पना आहे. वापर करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्वापर करणे (रिड्युस-रियुज-रिसायकल) ही संकल्पना आहे.

पन्नास टक्के वाचेल खर्च

दरवर्षी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सुमारे दोनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त खर्च पाठ्यपुस्तक निर्मितीवर केला जातो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेली पाठ्यपुस्तके बरेचसे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात. त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा करणे. सहज शक्य आहे. यामुळे राज्य शासनाची मोठी बचत होणार आहे.

पायलट प्रकल्पाकडे बघावे गांभीर्याने

येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचे पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे शासनाने ठरवले आहे. गेल्या वर्षभरातील वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्याचे आवाहन मुले व पालकांना करण्यात येणार आहे. ही योजना ऐच्छिक आहे. पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागावी. हा यामागचा हेतू आहे. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळा स्तरावर करण्यात येणार आहे. या उपक्रमातून कागदाची बचतही होणार आहे. झाडांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलनही साधले जाणार आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकांचा अधिक वापर झालेला नाही. चांगल्या स्थितीत पडून आहेत. ही पुस्तके मी स्वतःहून शाळेत जमा करणार आहे.

- प्रल्हाद पाटील, पालक कापडणे

संपादन - राजेश सोनवणे