
कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपाययोजनांसह नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे.
धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिस प्रशासनाकडून मास्क न वापरणे, गर्दी करणे, उपाययोजना न करणे आदींबाबत संबंधितांवर कारवाई सुरू केली. महापालिकेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. तसेच मंगल कार्यालयांचीही पाहणी केली. एका मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून दंड वसूल केला.
कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपाययोजनांसह नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीही तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. पथकाने शहरातील देवपूर भागातील मंगल कार्यालयातही पाहणी केली. या ठिकाणी विवाह सोहळ्यांतर्गत हळदीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला उपस्थितांची संख्या ५० च्या आत होती. मात्र त्यातील पाच जणांनी मास्क लावलेला नसल्याचे आढळल्याने पथकाने मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून एक हजार रुपये दंड वसूल केला. पथकप्रमुख प्रसाद जाधव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.