esakal | ‘रेमडेसिव्हिर’चा प्रश्‍न; आता कोविड रुग्णालयाशी संलग्न विक्रेत्यांनाच परवानगी 
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्हिरची मागणी वाढल्याने उत्पादकाकडून पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. या औषधाचा नियंत्रित वापर होण्यासाठी केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार विक्री करावी. या औषधाचा रुग्णालये व संस्थात्मक वापरासाठी पुरवठा करावा,

‘रेमडेसिव्हिर’चा प्रश्‍न; आता कोविड रुग्णालयाशी संलग्न विक्रेत्यांनाच परवानगी 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूबाधित अनेक रुग्णांकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी होत आहे. त्याची सुरळीत विक्री व वितरण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धुळे व नंदुरबारमधील सर्व घाऊक, किरकोळ औषधे विक्रेत्यांना काही नियम लागू केले आहेत. त्यात कोविड-१९ रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेत्यांनीच रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री करावी. अशा रुग्णालयाशी संलग्न नसेल, तर घाऊक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी रेमडेसिव्हिरची खरेदी-विक्री करू नये, असा आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे यांनी बुधवारी (ता. ७) बजावला. 
रेमडेसिव्हिरची मागणी वाढल्याने उत्पादकाकडून पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. या औषधाचा नियंत्रित वापर होण्यासाठी केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार विक्री करावी. या औषधाचा रुग्णालये व संस्थात्मक वापरासाठी पुरवठा करावा, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. रेमडेसिव्हिरची मागणी करताना रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व आधारकार्ड विक्रेत्याला देणे बंधनकारक आहे. बाजारात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची अधिकतम किंमत (MRP) व खरेदी किंमतीत (PTR) तफावत आहे. ते विक्री करताना अधिकतम किंमत न आकारता खरेदीची किंमत अधिक दहा टक्के रक्कम आकारावी. विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देशपांडे यांनी केले. 

काळजीपूर्वक वापर करावा 
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी सांगितले, की कोरोना विषाणूबाधित अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालयांबरोबरच बाजारात उपलब्ध आहे. या इंजेक्शनचा काळजीपूर्वक वापर करावा. त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता वैद्यकीय व्यावसायिकांनी घ्यावी. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी जनजागृतीसाठी पुढे यावे. काही गरजू रुग्णांना कोविड-१९ औषधोपचाराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. 

जिल्ह्यात सर्रास वापर 
जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा सर्रास वापर सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातून काही दिवसांत कृत्रिम तुटवडा जाणवला. आता तशी स्थिती नाही. या इंजेक्शनचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या इंजेक्शनचा साठा करून कुणी काळा बाजार करीत असेल तर ते गैर आहे. मानवतेच्या भावनेतून कुणीही असा प्रकार करू नये. गरजू रुग्णाला इंजेक्शन मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनीही आवश्यक असेल, तरच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा आग्रह धरावा. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठा तपासणीला अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने सुरवात केली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कारवाईची सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. 

संपादन- राजेश सोनवणे

loading image