esakal | फ्रंटलाइन वर्कर लसीकरणापासून वंचित

बोलून बातमी शोधा

vaccination
फ्रंटलाइन वर्कर लसीकरणापासून वंचित
sakal_logo
By
टिम इ सकाळ

देऊर (धुळे) : राज्यात लसीकरणाची जनजागृती सुरू आहे. मात्र लसीकरणाचा सावळा गोंधळामुळे फ्रंटलाइन वर्कर्स लसीकरणपासून वंचित असल्याचे चित्र प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समोर आले आहे. फ्रंटलाइन वर्कर्स लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे फ्रंटलाइन वर्कर ऑप्शनमध्ये ४५ वर्ष आतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण रजिस्ट्रेशन होत नाही. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश कर्मचारी लसीविना माघारी परतले आहेत.

आठ दिवसांपासून रजिस्ट्रेशन होत नसल्याने शासकीय कामासह ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्व्हेक्षण, खावटी वाटप, शैक्षणिक कामे, शालेय पोषण आहार वाटप कसे करावे? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान सर्वत्र लसीचे डोस संपले.

या कर्मचाऱ्यांना हवे प्राधान्य

पुन्हा नव्याने लसीचे डोस जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राप्त झाले. मात्र ४५ वर्ष आतील पत्रकार, आरोग्य विभागाशी संलग्न कर्मचारी, शिक्षक, कोरोनाशी संबंधित सामाजिक कार्यकर्ते आदींचे काय? एक मे पासून १८ वर्षांपुढे लसीकरण होणार असले तरी प्रथम या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन होत नसल्याने आम्ही लस देऊ शकत नाही. लसीचा हिशोब आम्हाला द्यावा लागणार आहे. ऑफलाइन लस देता येणार नाही. असे संबंधित प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगत आहेत.

अचानक लसीकरण बंद

धुळे तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. यात ४५वर्ष आतील बहुतांश शिक्षकांचा समावेश आहे. हे शिक्षक घरोघरी जाऊन माहिती घेतील. मात्र या शिक्षकांची सुरक्षित काय, तथा या शिक्षकांपासून धोका नसावा. याचा विचार जिल्हा प्रशासनाने करावा. जिल्ह्यात सर्व विभागाकडून अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे पत्र मुख्याध्यापक, जबाबदार घटकांना दिले आहे. मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशन मध्ये फ्रंटलाइन वर्कर्स तथा ४५ वर्ष आतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत नाही. याचे काय? एक तारखेनंतर लसीसाठी गर्दी होणार आहे. यामुळे हा टप्पा पूर्ण होणे आवश्यक होता. जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे आले असता त्यांना फ्रंटलाइन वर्क पत्रकारांतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे.

दरम्यान मागील आठवड्यात ऑनलाइन प्रणालीत ४५ वर्ष आतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. आता अचानक बंदमुळे शिक्षक, फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत तिढा सुटावा. ही अपेक्षा सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे.