esakal | वडिलांनी मुले जुंपली भिकेला; सोबतच वाढला प्रेमप्रकरणांचा ताप

बोलून बातमी शोधा

father begged
वडिलांनी मुले जुंपली भिकेला; सोबतच वाढला प्रेमप्रकरणांचा ताप
sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : कोरोनामुळे आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कळीत होत चालल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. विशेषतः गरीब, झोपडपट्टीचे भाग, रोजच्या मिळकतीवर उदरनिर्वाह करणारे मजूर, मोलकरीण आदी संबंधित घटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कौटुंबिक हिंसाचार, नशेखोरीच्या प्रमाणात वाढ, शाळा- महाविद्यालये बंद असल्याने प्रेमप्रकरणांचा ताप, पळून जाण्याचेही वाढते प्रकार आणि त्याचा कळस बालविवाहांवर भर देण्याची प्रथा सुरू झाली आहे. ही विदारक स्थिती कोण आणि कशी सावरणार हा प्रश्‍न आहे.

शहरासह जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली, नंतर टप्प्याटप्प्याने काही निर्बंधांसह संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यात न्यायदंडाधिकार प्रदान असलेल्या बालकल्याण समितीकडे प्राप्त होत असलेल्या तक्रारी, मदतीच्या मागणीतून काही घटकांची आर्थिक, सामाजिक घडी विस्कळीत होत चालल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

नशेसाठी मारहाणीचे प्रकार

गरीब घटकात काम नसल्याने वडिल दारूसाठी मुलांना भिक मागण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यासाठी मुलामुलींना रोजचे भिकेतून ५० ते १०० रूपये आणण्याचे टार्गेट दिले जाते. त्यास विरोध दर्शविला तर पत्नीला, तसेच मुलांनी नापसंती दर्शविली तर त्यांना बेदम मारहाण केली जात आहे. या प्रकारात केवळ वडिलधारीच नाही तर शालेय विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकत आहेत. एका गावात पाचवी ते सहावीच्या मुलीला वडिल दारू दुकानावर पाठवतात. तिथे इतर मद्यपी त्या मुलीची छेडखानी करतात. वडिलांच्या सांगण्याला त्या मुलीने विरोध केला तर तिला मार खावा लागला. धुळे शहराच्या परिसरातील अशा गंभीर घटना रोखण्यासाठी कुणी पुढे येत नाही, तर शेजारचे तमाशा पाहण्यात धन्यता मानत आहेत.

प्रेमप्रकरण, संबंधांचा ताप

शाळा- महाविद्यालये बंद असल्याने प्रेमप्रकरणाचा ताप वाढत आहे. वडिल दारूच्या नशेत, आईची मिळेल ते काम करून दिवसाच्या मिळकतीतून जेवणाची सोय करण्यासाठी धडपड, त्यामुळे घरात काही काम नसलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचे किंवा मुलीही मुलांकडे आकर्षित होत असल्याने पळून जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असेच प्रकार तरूण- तरूणी, विवाहितांबाबतही घडत आहेत. यात विवाहबाह्य संबंधांचा प्रश्‍नही ऐरणीवर येत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात बदनामीला सामोरे जाण्यापेक्षा मुलींचा विवाह करण्यास पसंती दिली जात आहे. परिणामी बालविवाहांचे प्रमाण वाढत चालले आहेत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनंतर बालकल्याण समितीमार्फत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चौदा वर्षाच्या मुलीला अपत्य

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) परिसरात तर १४ वर्षीय मुलीला गर्भधारणा झाली आणि तिला अपत्य झाले. तिला २२ वर्षाच्या मुलाने जाळ्यात अडकविले. संबंधित कुटुंब मुलीसह अपत्याला स्विकारायला तयार नाही. ते कुटुंब पोलिसांनाही दाद द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे.

मोलकरणींवर भिक मागायची वेळ

कोरोनामुळे असंख्य कुटुंबांनी मोलकरणींची सेवा बंद केली आहे. त्यामुळे शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील महिला महामार्गालगत भिक मागत फिरत असल्याचे चित्र दिसते. यात संबंधित बालकांसह नकाणे, बिलाडी, फागणे आदी शहर- परिसरात विविध गंभीर समस्या भेडसावत असल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, प्रा. सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, ॲड. मंगला चौधरी यांनी सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे