धुळ्यात नऊ विदेशी पाहुणे; सर्वांना केले क्वारंटाईन 

निखील सुर्यवंशी
Friday, 25 December 2020

लंडनमध्ये नवीन प्रकारातील कोरोना विषाणूचा संसर्ग आढळल्यावर जागतिक पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विमान सेवा प्राधिकरणाने २३ नोव्हेंबरनंतर धुळे शहरात दाखल झालेल्या नऊ जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सोपविली आहे.

 धुळे : लंडनमध्ये (युके) काही दिवसांपूर्वी नवीन प्रकारातील कोरोना विषाणू आढळल्याने जगात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशात हवाई मार्गाने २३ नोव्हेंबरनंतर धुळे शहरात आलेल्या नऊ विदेशी नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेची देखरेख सुरू आहे. संबंधित नऊ जणांची प्रकृती उत्तम असून चिंतेचे कारण नाही, असे यंत्रणेने सांगितले. 

लंडनमध्ये नवीन प्रकारातील कोरोना विषाणूचा संसर्ग आढळल्यावर जागतिक पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विमान सेवा प्राधिकरणाने २३ नोव्हेंबरनंतर धुळे शहरात दाखल झालेल्या नऊ जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सोपविली आहे. याआधारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह विविध खबरदारीच्या उपाययोजना राबवित विदेशातून आलेले ते नऊ नागरिक यंत्रणेच्या देखरेखीत आहेत. 

पाच जण धुळे शहरातील
संबंधित पाच नागरिक मूळ धुळे शहरातील रहिवासी आहेत. सद्यःस्थितीत ते ब्रिटीश रहिवाशी आहेत, तर एक महिला आयर्लंड येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. नऊ जणांमध्ये तीन महिला, दोन पुरूष, चार बालकांचा समावेश आहे. ते २३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत धुळे शहरात वास्तव्यास असल्याने त्यांची यादी विमान प्राधिकरणाने जिल्हापातळीवर पाठविली. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने संबंधित नऊ जणांची तपासणी केली. त्यांना कोरोनाची कुठलिही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे संक्रमणाचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाईन केले आहे, असे यंत्रणेने सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news coronavirus nine returnees from abroad quarantine in dhule