esakal | मनपा उपायुक्त गायब; सहा तास शोधाशोध, अपघाताचा भास 
sakal

बोलून बातमी शोधा

missing

महापालिकेत शुक्रवारी दुपारी दोनपर्यंत आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गोसावी आणि इतर सहकारी अधिकारी बैठकीत होते. नंतर ते घरी जाण्यास निघाले. उपायुक्त गोसावी स्वतः कारने ड्रायव्हींग करत घरी निघाले.

मनपा उपायुक्त गायब; सहा तास शोधाशोध, अपघाताचा भास 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : महापालिकेचे उपायुक्त शांताराम गोसावी शुक्रवारी (ता. १) दुपारी दोननंतर गायब झाले. त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ आणि बराच वेळ ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी आयुक्तांना, तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ऐेन थंडीत उपायुक्तांचा शोध घेताना वरिष्ठ अधिकारी घामाघूम झाल्याची प्रचिती आली. 

अपघाताचा भास अन्‌ उपायुक्‍त गायब
महापालिकेत शुक्रवारी दुपारी दोनपर्यंत आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गोसावी आणि इतर सहकारी अधिकारी बैठकीत होते. नंतर ते घरी जाण्यास निघाले. उपायुक्त गोसावी स्वतः कारने ड्रायव्हींग करत घरी निघाले. ते जमनागिरी रोड परिसरातील निवासस्थानाकडे जाताना त्यांना अपघाताचा भास झाला, बालक चिरडला गेल्याच्या गैरसमजूतीतून नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारचे चाक गटारीत रूतले. घाबरल्याने उपायुक्त गोसावी एकाच्या मदतीने मोटारसायकवरून थेट नागपूर- सुरत महामार्गावरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ पोहोचले. तेथे घामाघूम अवस्थेत असताना त्यांचा इतर नागरिकाच्या मोबाईलव्दारे नगरसेवक किरण अहिरराव यांच्याशी संपर्क झाला. उपायुक्त गोसावी यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता. अहिरराव मंदिराजवळ पोहोचल्यानंतर त्यांना उपायुक्त गोसावी यांनी जमनागिरी रोडवर झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच मला शहराबाहेर घेऊन चला, असे सांगितल्यावर उपायुक्त गोसावी यांना अहिरराव यांनी साक्री येथे एका फार्म हाऊसवर नेले. 

घरीही आले नाही अन्‌ मोबाईल स्‍वीच ऑफ
या सर्व कालावधीत गोसावी यांच्या कुटुंबियांनी आयुक्त शेख यांच्याशी संपर्क साधत विचारणा केली. गोसावी घरी पोहोचले नाही, मोबाईल स्वीच ऑफ त्यामुळे आयुक्तांनी महापौर, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष यांच्यासह पोलीस अधीक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. मग गोसावींची शोधाशोध सुरू झाली. यातून अहिरराव यांच्यापर्यंत हा प्रकार पोहोचला. त्यांनी आयुक्तांना दूरध्वनी करत उपायुक्त गोसावी ठिकठाक असून चिंता करू नये, असा निरोप दिल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. रात्री नऊला गोसावी घरी पोहोचल्यावर त्यांचे कुटुंबिय चिंतामुक्त झाले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image