‘एलईडी‘चा झगमगाट अजून दूरच; जुन्याच कंत्राटदाराला सहा महिने मुदतवाढ

रमाकांत घोडराज
Tuesday, 2 February 2021

पथदिव्यांच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीच्या कामाला सहा महिने मुदतवाढ देण्याचा विषय होता. या विषयावर खुद्द सभापती श्री. बैसाणे, सदस्य अमोल मासुळे यांनी शंका उपस्थित केली.

धुळे : संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविण्यास मंजूरी दिल्यानंतरही नवीन कंत्राटदाराला काम सुरू करण्यास अजून अवधी लागणार असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले गेले. त्यामुळे शहरातील पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुन्हा जुन्याच कंत्राटदाराला सहा महिने मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. विशेष म्हणजे या जुन्या कंत्राटदाराने तीन वर्षा पूर्वीच्या दरानुसार काम करण्याची तयारी दाखविली आहे. 
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सकाळी दहाला महापालिका सभागृहात झाली. सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. समितीपुढे पथदिव्यांच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीच्या कामाला सहा महिने मुदतवाढ देण्याचा विषय होता. या विषयावर खुद्द सभापती श्री. बैसाणे, सदस्य अमोल मासुळे यांनी शंका उपस्थित केली. तर सदस्य संतोष खताळ यांनी सध्याचा कंत्राटदाराकडून आठ-आठ दिवस तक्रारीचे निवारण होत नसल्याचा मुद्दा मांडला. युवराज पाटील यांनी मालेगावरोडवरील बंद पथदिव्यांबाबत दखल घेतली जात नसल्याचे सांगितले. 

दरमहा साडेदहा लाख बिल 
पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदाराचे दरमहा साडे दहा लाख रुपये बिल निघते असे कनिष्ठ अभियंता एन. के. बागुल यांनी सांगितले. हाच धागा पकडून सदस्य अमोल मासुळे यांनी दहा-बारा कोटी रुपये खर्चातून महापालिका एलईडी बसविणार आहे. तरीही पुढचे सहा महिने महापालिकेला ६०-६५ लाख रुपये द्यावे लागतील. त्यामुळे प्रशासन नेमके काय करते तेच कळत नाही असे म्हणत जुन्या कंत्राटदाराला २-३ महिनेच मुदतवाढ द्या असे मत मांडले. शेवटी सभापती श्री. बैसाणे यांनी पथदिव्यांच्या तक्रारीनंतर काम होत नसेल तर जबाबदारी तुमची असे अधिकाऱ्यांना सांगत विषय मंजूर केला. 

एलइडीसाठी प्रतिक्षाच 
संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी दहा कोटी ६५ लाख रुपये खर्चाला मंजुरी आहे. एलईडीचा हा विषय २२ डिसेंबर २०२० ला स्थायीने मंजूर केला. त्यानंतर कंत्राटदार मे. वल्लभ इलेक्ट्रीकल्स, व्ही. यू. नगर (जि. आनंद, गुजरात) यांना २५ जानेवारी २०२१ ला कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र, कंत्राटदाराकडून डीपीआर तयार होईल व त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. त्यामुळे एलईडी पथदिव्यांसाठी अजून काही महिने प्रतिक्षाच करावी लागणार आहे. 
 
वरखेडीत अमरधाम 
स्थायी समितीने प्रभाग क्रमांक १० मधील वरखेडी येथे नवीन अमरधामसाठी ७८ लाख २८ हजार ३६८ रुपये खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिली. तसेच प्रभाग क्रमांक- ७ मधील रमापती नगर ते गवळीवाडादरम्यान काँक्रीट रस्ता व गटारासाठी ९५ लाख २२ हजार ७९२ रुपये खर्चालाही मंजुरी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news corporation sthayi camity led lamp on six month