esakal | बनावट मद्यासाठीचे साहित्य येते कुठून?; गैरउद्योग जिल्ह्यासह तरुणांच्या मुळावर 
sakal

बोलून बातमी शोधा

wine

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बनावट मद्यनिर्मितीचे कारखाने बंद होण्यासाठी वाढत आहेत, लाखोंचा साठा सापडत आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांच्या कारवाईचे स्वागतच असेल.

बनावट मद्यासाठीचे साहित्य येते कुठून?; गैरउद्योग जिल्ह्यासह तरुणांच्या मुळावर 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : जिल्ह्यात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही दिवसांत एक कोटी रकमेचा बनावट मद्यसाठा सापडला. तो जप्त झाला. काही संशयित ताब्यात आले. मात्र, ‘बनावट मद्याचे हब’ अशी नवी ओळख लाभलेला धुळे जिल्ह्यातील कर्तबगार उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणेला बनावट मद्याचे साहित्य येते कुठून, याचा अद्याप तपास लागलेला नाही. तो लागला असेल, तर बनावट मद्याचे कारखाने, साठा वारंवार का सापडतो, याचा जाब या यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागेल. 
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बनावट मद्यनिर्मितीचे कारखाने बंद होण्यासाठी वाढत आहेत, लाखोंचा साठा सापडत आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांच्या कारवाईचे स्वागतच असेल. मात्र, जिल्ह्यासह तरुणांच्या मुळावर उठलेल्या या गैरउद्योगाला पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग लगाम का घालू शकत नाही, असा सुज्ञ धुळेकरांना पडलेला प्रश्‍न आहे. 

उत्पादन शुल्क विभागाची भूमिका 
काही दिवसांपूर्वी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने आर्वी शिवारात बनावट मद्यप्रकरणी कारवाई केली. त्या वेळी अधीक्षक संजय पाटील यांनी १ ते १० डिसेंबरच्या कालावधीत धुळे शहर, साक्री, छडवेल येथे केलेल्या कारवाईत सुमारे ७० ते ८० लाख किमतीचा बनावट देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून, स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, लेबलसह विविध साहित्य कुठून येते याचा विभागाकडे कमी मनुष्यबळ असूनही तपास केला जात असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. या संदर्भात अधिकारी महाडिक म्हणाले, की ताब्यातील नऊ संशयितांच्या चौकशीत रिकाम्या बाटल्यांचा पुरवठा करणाऱ्या नाशिकच्या संशयिताला अटक केली. स्पिरिट कुठून आणले, अशी विचारणा केल्यावर संशयित काही सांगायला तयार नाही. बनावट मद्यात डुप्लिकेट बूच वापरली जातात. ती कुठून येतात त्याचा तपास सुरू आहे. बनावट मद्यनिर्मितीतील काही साहित्याविषयी माहिती मिळून येत नाही. 

जिल्ह्याच्या नशिबी बदनामी 
उत्पादन शुल्क विभागापाठोपाठ कमी-अधिक प्रमाणात पोलिस यंत्रणेच्या तपासातही बनावट मद्यनिर्मितीचे कारखाने, साठ्याबाबत साहित्याची उपलब्धता कशी व कुठून होते, त्यासंबंधी सक्रिय रॅकेट जाळ्यात अडकविण्यात यश येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक गैरव्यावसायिक बिनबोभाट फिरतात. परिणामी, बनावट मद्यनिर्मितीचा उद्योग खुलेआम सुरू राहतो. त्यामुळे जिल्हा बदनाम होऊ लागला आहे. या गैरउद्योगाविषयी कारवाई दिसते, पण त्याला चाप, लगाम बसल्याचे दिसून येत नाही. यात नेमके कुठे पाणी मुरते याची चौकशी होण्याची गरज धुळेकर व्यक्त करतात. बनावट मद्यनिर्मितीचे साहित्य नेमके येते कुठून याचा सखोल तपास होऊन मासे गळाला लागत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यासह अनेक तरुणांचे जीवन अंधकारात असेल, असे म्हटले जाते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image