झोपेतून उठवत बेडवर केली फायरिंग..चुपचाप खडे रहो म्‍हणत धमकावले अन्‌ लुटले आठ लाख

theft
theft

सामोडे (धुळे) : येथे मंगळवारी (ता. १२) रात्री तीनच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील तिन्ही सदस्यांना एका खोलीत बंद करून तलवार, कोयते, बंदुकीचा धाक दाखवून सोने व रोकड लुटल्याची घटना घडली. 
येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक शरद शिंदे (वय ६३) यांचा सामोडेच्या विठ्ठलनगरात कन्या शाळेशेजारी शेत गट क्रमांक ४८/२ मध्ये बंगल्यात पत्नी ऊर्मिला शिंदे, मुलगा, सून व नाती सोबत राहतात. 

अगोदर झोपेतून उठविले
मंगळवारी रात्री जेवणानंतर मुलगा आपल्या रूममध्ये, तर आई-वडील आपल्या रूममध्ये झोपलेले असताना रात्री तीनच्या सुमारास खिडकीचा आधार घेऊन दरोडेखोरांनी टेरेसवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चिखलाने भरलेल्या बुटांचे ठसे उमटलेले दिसले, तर इतरांनी लॉक तोडून घरात प्रवेश केला. सुरवातीस शरद शिंदे यांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांना झोपेतून उठवून त्यांना बंदूक व तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याजवळील मोबाईल ताब्यात घेऊन त्यांना एका खोलीत नेत ‘आप चुपचाप खडे रहो, अगर आपकी जान प्यारी है तो आपके पास जितना माल है, उतना चुपचाप निकाल दो’, असे तीन दरोडेखोरांनी धमकावले. 

फायरिंगही केली
अन्य दोन दरोडेखोरांनी बाजूलाच्या बेडरूममधील मुलाला उठवून बेडवर बंदुकीची फायरिंग केली. त्यामुळे मुलगा व आई-वडील अधिकच भयभीत झाले. नंतर तिघांना बंदुकीचा धाक दाखवत घरातील लॉकर, कपाट, सगळ्या वस्तूंची झडती घेण्यास सुरवात केली. यात जे हाती मिळेल ते पैसे, सोने ताब्यात घेतले. 

मोबाईल गच्चीवर फेकत पलायन
धारदार शस्त्राचा धाक दाखवून एक लाख ९४ हजार रुपयांची रोकड व सहा लाख ९३ हजार रुपयांचे सोने असा ऐवज घेऊन पलायन केले. जाताना त्यांनी शिंदे यांच्या वाहनाच्या चाकाची हवा सोडून शिंदे कुटुंबीयांचे मोबाईल बाहेर गच्चीत टाकून निघून गेले. घरासमोरील शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दरोडेखोरांना माहिती असावी म्हणूनच ते मागील दाराने पळाल्याचा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला. घटनेची खबर मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खेडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. धुळ्याहून बुधवारी (ता. १३) सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, साक्री विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर या पोलिस अधिकऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय धुळ्याहून श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरोडेखोर दहिवेल मार्गाने पसार झाल्याचे सांगितले जात आहे. या धाडसी दरोड्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com