दोंडाईचात दोन गट भिडले; तणावाचे वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

दोंडाईचात रविवारच्या सुटीमुळे सर्वत्र शांतता होती. मात्र, दुपारी दीडनंतर म्‍हाळसानगरामध्ये दोन विभिन्न गट किरकोळ कारणावरून समोरासमोर आले. काही दिवसांपुर्वीच दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. त्‍याची धग दोन्ही गटांमध्ये कायम होती.

दोंडाईचा (धुळे) : म्‍हाळसानगरात दुपारी दीडनंतर दोन विभिन्न गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्‍याचे पर्यावसान हाणामारीत झाले. ही घटना दोंडाईचा शहरासह जिल्‍ह्‍यात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शहरात तणावाचे निर्माण जिल्‍हा पोलिस प्रशासनाने अधिक पोलिस तैनात करत स्‍थिती नियंत्रणात आणली आहे. यातील जखमी तरूणाला धुळे शहरात उपचारासाठी पाठविण्यात आले असून, दुसऱ्या गटातील वीस वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
दोंडाईचात रविवारच्या सुटीमुळे सर्वत्र शांतता होती. मात्र, दुपारी दीडनंतर म्‍हाळसानगरामध्ये दोन विभिन्न गट किरकोळ कारणावरून समोरासमोर आले. काही दिवसांपुर्वीच दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. त्‍याची धग दोन्ही गटांमध्ये कायम होती. अशात आज दुपारी दीडला जार वाटपाचे काम करणारा शाहरूख शाह फारूख शाह (वय २२) हा तरूण म्‍हाळसानगर परिसरातून जात होता. त्‍यावेळी दुसऱ्या गटातील काही तरूण त्‍याच्यासमोर आले. त्‍यांच्यात बाचाबाची होवून वाद वाढत गेला. त्‍यानंतर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांसमोर आल्‍याने त्‍याचे पर्यावसान हाणामारीत झाले. ही घटना दोंडाईचा शहरासह जिल्‍ह्‍यात पसरली. तसेच दोंडाईचा शहरात भितीचे वातावरण निर्माण होवून अनेक दुकानदारांनी व्यवसाय बंद केले. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. तणवाच्या स्‍थितीमुळे जिल्‍हा पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत दंगा नियंत्रण पथक, शिंदखेडा व अन्य ठिकाणाहून अधिक पोलिस कुमत दोंडाईचात पाठविले. त्‍यानंतर स्‍थिती नियंत्रणात आली. दोंडाईचात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्‍त तैनात आहे. स्‍थिती नियंत्रणात असून, नागरीकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, चुकीचे संदेश वहन करू नये, शांतता राखावी, सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. यानंतर जखमी तरूण शाहरूख शाह यास प्राथमिक उपचारानंतर धुळे शहरात उपचारासाठी पाठविण्यात आले. तसेच पोलिसांनी संशयीत शुभम कोळी (वय २०) यास ताब्‍यात घेतले असून तपास सुरू आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news crime news two groups clashed one injured