esakal | शिरपूर तालुक्यात तत्काळ भरपाई मिळावी 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp shirpur

शिरपूर तालुक्यात १८ फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

शिरपूर तालुक्यात तत्काळ भरपाई मिळावी 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा व भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 
शिरपूर तालुक्यात १८ फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. हरभरा, गहू, मका, ज्वारी, उन्हाळी मूग, भुईमूग, केळी, पपई, आंबा, डाळिंब, लिंबू आदी विविध पिके, फळबागांचे यात नुकसान झाले आहे. या सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, त्यासाठी प्रशासनाने शासनस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 
आमदार पावरा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सोमवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर शेतकरी साखर कारखान्याचे संचालक भरत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
 
मागचा मोबदलाही द्या 
मार्च २०२० मध्येही वादळी वारा, गारपीट व अतिवृष्टीमुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. त्याचाही मोबदला द्यावा. तसेच वीजग्राहकांना महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता घरगुती, व्यावसायिक, शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा एकतर्फी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही कारवाई थांबवावी, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे