esakal | धुळे जिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावर ऑक्सिजन टँक : मंत्री राजेश टोपे 
sakal

बोलून बातमी शोधा

minister rajesh tope

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत झालेल्या नवीन इमारतीसह जिल्हा रुग्णालयातील कोविड बाह्यरुग्ण कक्ष आणि पिंपळनेर (ता. साक्री) येथे कार्यान्वित झालेल्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. 

धुळे जिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावर ऑक्सिजन टँक : मंत्री राजेश टोपे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यातील गरजू कोरोनाबाधितांसाठी बफर स्टॉकमधून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांना उसनवारीच्या तत्त्वावर ३०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून द्यावीत. त्यांचा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वापर करावा. तालुकास्तरावर ऑक्सिजनचे टँक कार्यान्वित करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिले. 
मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ५) सायंकाळनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ चा प्रादुर्भाव व आनुषंगिक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी संजय यादव, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारूक शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिकराव सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांताधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते. 
मंत्री टोपे यांच्या हस्ते कुडाशी (ता. साक्री) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत झालेल्या नवीन इमारतीसह जिल्हा रुग्णालयातील कोविड बाह्यरुग्ण कक्ष आणि पिंपळनेर (ता. साक्री) येथे कार्यान्वित झालेल्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. 

मंत्री टोपे यांच्या सूचना 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी झाली पाहिजे. त्याबरोबरच खाटांची संख्याही वाढवावी. बाधित रुग्ण कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलसह शासकीय संस्थांमध्ये अधिकाधिक संख्येने दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी गावागावांत जनजागृती अभियान राबविले पाहिजे. कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयाने आयएमएच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. ते शासनाने निर्धारित केलेल्या दराने विक्री झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. 

ऑक्सिजन टँकबाबत निर्णय 
ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून तालुकास्तरावर आठवडाभरात ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. 
ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू नये म्हणून विभागीय आयुक्तांच्या स्तरावर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांसह वीसपेक्षा जास्त खाटा आणि कोल्ड चेनसह शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुविधा उपलब्ध असतील, तर कोविड-१९ लसीकरण केंद्राला मंजुरी द्यावी. अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका कार्यकर्ती, आशा स्वयंसेविकांनी ४५ वर्षांवरील नागरिकांची यादी तयार करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. याकामी सीईओंनी नियमितपणे आढावा घ्यावा. महापालिकेने लवकरात लवकर विद्युतदाहिनी कार्यान्वित करावी. 

जिल्ह्यात ३८७ बेड शिल्लक 
जिल्हाधिकारी यादव यांनी कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर १२.२२ टक्के आहे, असे सांगत हिरे महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात येत आहे, सध्या चार हजार ४६ रुग्ण सक्रिय असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत असल्याचे सांगितले. धुळे शहर व साक्री तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. फेरीवाले, दुकानदारांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांची रॅपिड अॅन्टिजेन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये पाच हजार ७३१ बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनयुक्त एक हजार ७० बेड उपलब्ध असून, त्यांपैकी ३८७ बेड रिक्त आहेत. आयसीयूचे २७८ बेड असून, ३९ रिक्त आहेत. आतापर्यंत ७८ हजार ६५९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. श्री. रंधे, महापौर सोनार, आमदार रावल, सौ. गावित, डॉ. शाह यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले 
- विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 
- प्रत्येक रुग्णालयामध्ये दरफलक लावावेत. 
- धुळ्यात स्त्री रुग्णालय तातडीने कार्यान्वित करावे. 
- जिल्ह्यात यंत्रणेनेने ‘कोविड-१९’ लसीकरण मोहिमेला गती द्यावी. 
- ‘रेमडेसिव्हिर’चा अनावश्यक, गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. 
- वैद्यकीय महाविद्यालयाने नवीन यंत्रणा कार्यान्वित करून चाचण्यांची संख्या वाढवावी. 
- जिल्हा रुग्णालयासह साक्री, शिरपूर, दोंडाईचात आठवड्यात ऑक्सिजन टँक उभारावा.

loading image