esakal | जामफळ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

jamfal sulwade project

जामफळ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : शेतकरी आंदोलनात ३० दिवस कामबंद पडल्यानंतर तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम नुकतेच पुन्हा सुरू झाले असले, तरी फारसा वेग नाही. मुरूम, काळ्या मातीची कमतरता व शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागेल.

धरणातील ७० टक्के भरलेले पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर सोडल्यानंतर वेगवान कामाची अपेक्षा असताना, शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी आंदोलन सुरू केले. प्रशासनाने आंदोलन थांबविण्याचा फारसा प्रयत्न न केल्याने आंदोलन महिनाभर लांबले. त्यामुळे ठेकेदाराने वैतागून वाहने व अन्य साहित्य परत पाठविले. नुकतेच शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्यानंतर धरणाचे काम पुन्हा सुरू झाले. मात्र, साहित्य नसल्याने काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. आंदोलनापूर्वी ३५ ते ४० डंपर १२ तास माती, मुरूम वाहतूक करायचे. सध्या चार ते पाच डंपर आहेत.

माती काढण्यासही अडचण

बांधासाठी लाखो टन मुरूम आवश्यक असताना, मुरूम नसल्याने बांधाचे मुख्य काम रखडले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जलवाहिनी तयार करण्याचे काम सुरू झाले असून, हेड रेग्युलेटरचे (पाटचारी) काम प्रगतिपथावर आहे. जामफळ धरणातून पाण्याचा निचरा होऊ नये, म्हणून बांध बांधताना काळ्या मातीचा उपयोग केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने शेतातून काळी माती काढता येत नाही. परिणामी, मुरूमही मिळत नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची प्रकिया कोरोनामुळे मध्येच बंद पडली. धरणाचे काम वेगात होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला देऊन शेती ताब्यात घेऊन काम सुरू करणे आवश्यक असताना, त्यात दिरंगाई का, असा प्रश्न आहे.

२०२२ पर्यंत योजना पूर्ण करणे बंधनकारक

२०२२ पर्यंत योजना पूर्ण करणे बंधनकारक आहे. ५८ लाख घनमीटर मुरूम आवश्यक असताना, आतापर्यंत केवळ १० ते १२ लाख घनमीटर मुरूम मिळाला आहे. याशिवाय १५० लाख घनमीटर काळ्या मातीपैकी फक्त २२ ते २५ लाख घनमीटर उपलब्ध झाली आहे. प्रकल्पासाठी सुमारे ५५० हेक्टर शेती संपादित करावयाची असून, मूळ धरणाची ६० हेक्टर तसेच सोनगीर शिवारातील ४८ हेक्टर शेती संपादित झाली आहे.

२५ टक्‍केच काम झाले

दरम्यान, काम सुरू झाले असले तरी अद्याप सुमारे ४५२ हेक्टर शेती संपादित करायची असून, शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा आहे. दोन वर्षांत धरणााचे केवळ २५ टक्के काम झाले. आता पुढील दोन वर्षांत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. या पार्श्‍वभूमीवर पाण्यासाठी परिसराला किती वर्षे ताटकळावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

संपादन- राजेश सोनवणे