esakal | गावागावांत कारभारी निवडचेच गुऱ्हाळ; उमेदवारांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागली, तर मतदारांनी अनेकांना धोबीपछाड दिला आहे, यात काही शंका नाही. मुख्य म्हणजे निवडून आलेले पॅनलदेखील आले; पण सरपंच कोण होणार? आरक्षण सोडत झाल्याशिवाय ते समजूच शकणार नाही.

गावागावांत कारभारी निवडचेच गुऱ्हाळ; उमेदवारांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे 

sakal_logo
By
दीपक वाघ

बभळाज (धुळे) : शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध होऊन २८ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, सदस्यांच्या निवडीनंतर गावोगाव आता सरपंचपद आरक्षणाचीच चर्चा सुरू आहे. 
निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागली, तर मतदारांनी अनेकांना धोबीपछाड दिला आहे, यात काही शंका नाही. मुख्य म्हणजे निवडून आलेले पॅनलदेखील आले; पण सरपंच कोण होणार? आरक्षण सोडत झाल्याशिवाय ते समजूच शकणार नाही. त्यामुळे सरपंचपदासाठी कुणाची वर्णी लागेल, हे अजून गुलदस्त्यातच आहे. शिरपूर तालुक्यात गावागावांत कोण सरपंच होणार, याबाबत मात्र कट्ट्याकट्ट्यावर चर्चा होताना दिसत आहे. या वेळी थेट जनतेतून सरपंच निवड न होता पूर्वीप्रमाणे निवडून आलेल्या सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असल्याने सर्वच प्रवर्गांचे सदस्य निवडून येण्यासाठी गावपुढाऱ्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. 

सरपंचपद खुले असल्‍यास
आता निवडणुका पार पडून निकालही जाहीर झाला असून, खरी प्रतिष्ठा असते ती सरपंच या पदाची. या पदासाठी अनेकजण इच्छुक असतात. ठराविक प्रवर्गासाठी सरपंच पद सोडत घेऊन निश्चित होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपद खुले असल्यास सर्व सदस्य या पदासाठी पात्र ठरतात. मात्र विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यास त्याच प्रवर्गातून निवडून आलेल्या व्यक्तीलाच ती संधी मिळते. मग त्या गटाचे बहुमत असो किंवा नसो निवडून आलेली व्यक्ती ही त्या ग्रामपंचायतीत एकमेव व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला ही संधी सोन्यासारखी चालून येते. कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यास कोणाला सरपंच करता येईल, या पदावर कोणाला बसवल्यास आपल्याला फायद्याचे राहील, याचा अंदाज बांधण्यास गावपुढाऱ्यांनी सुरवात केली आहे. 
 
राजकीय हालचालींना वेग 
गावोगावी आता सरपंचपदाच्या आरक्षणाचीच चर्चा असून, आरक्षण सोडत निघाल्यावर आपल्या गटाचाच सरपंच निवडून येण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतमोजणी पूर्ण झाली असली तरीही आरक्षण सोडत अजून बाकी असल्याने बहुमत मिळवूनही सरपंचपद कुणाच्या पथ्यावर पडते, हे अजून गुलदस्त्यातच असल्यामुळे विजयी उमेदवारांची धाकधूक कायम असून, सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, याची उत्कंठा निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे