
एकाच घरातील मतदारांची विभागणी चक्क दोन ते चार प्रभागांमध्ये झाली आहे. या अजबगजब प्रभागरचनेचे खापर राजकीय नेत्यांवर फोडले जात आहे.
कापडणे (धुळे) : येथील प्रभागरचनेतील बिघाडामुळे उमेदवारांची प्रचार करताना मोठी दमछाक होत आहे. प्रभाग तीनमधील मतदारांची विभागणी चक्क सहा प्रभागांमध्ये झाली आहे. प्रत्येक उमेदवाराला तीनमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत, तर एकाच घरातील मतदारांची विभागणी चक्क दोन ते चार प्रभागांमध्ये झाली आहे. या अजबगजब प्रभागरचनेचे खापर राजकीय नेत्यांवर फोडले जात आहे.
एकाच घरात तीन प्रभागांचे मतदार
येथील मतदारसंख्या ११ हजारांवर असून, सहा प्रभाग आहेत. प्रभाग तीन सर्वांत मोठा, तर प्रभाग सहा सर्वांत लहान आहे. प्रभाग तीनमधील दोनशेपेक्षा अधिक मतदारांची अनधिकृतपणे उचलबांगडी, इतर पाच प्रभागांमध्ये केली आहे. म्हणजे तीनमध्ये तीनसह सहा प्रभागांच्या मतदारांचा रहिवास आहे, तर इतर प्रभागातील मतदारांची विभागणीही अशीच झाली आहे. पती-पत्नी आणि सासू-सासरे वेगवगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत.
प्रभाग चारचा विस्तार एक किलोमीटर
प्रभाग चारचा विस्तार चक्क एक किलोमीटरपर्यंत झाला आहे. या प्रभागात गावपोळ गल्ली, बोरसे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, सुदर्शन चौक, सुतारवाडा, चर्मकारनगर, कामगारनगरचा काही परिसर, सरवड रस्ता परिसर, वडारवाडा, इंदिरानगर, पारधीवाडा, राजवाडा, जवाहरनगर आदी १३ भागांचा समावेश करून इतर प्रभागांची मोठी तोडफोड झाली आहे. हे सारे अंतिम प्रभागरचनेत झाल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.
मतदारांची विभागणी खोडसाळपणाची
प्रत्येक प्रभागातील मतदारांची विभागणी राजकीय खोडसाळपणा आहे. यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे. मात्र, काहींना राजकीय पोळी भाजून घेता येत असल्याचा आरोप-प्रत्यारोपही होत आहे. यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आम्हनं शेवटलं इलेक्शन!
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. समाज व भाऊबंदकीवरून मोठे राजकीय भांडवल केले जात आहे. आमचाच भाऊबंदकीतील उमेदवार कसा योग्य हे पटविण्यासाठी मोठी मेहनत घेतली जात आहे, तर निवडून येण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. यात ‘पडो किंवा निवडो, आम्हनं शेवटलं इलेक्शन से, निवाडीच देणं पडीन,’ असे म्हणत कोरडी सहानुभूती निर्माण करण्याचा फंडा मोठा चर्चेत आला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे