सिमेंटच्या जंगलात मोबाईल टॉवर्सची दाटी 

महेंद्र खोंडे
Tuesday, 23 February 2021

शहरातील पक्ष्यांचा किलबिलाट शांत झाला आहे. घरातील फोटोमागे घरटे करून राहणारी चिमणी नामशेष होत आहे. त्या लहरींचा पर्यावरणावर जेवढा परिणाम होत आहे तेवढाच मानवी आरोग्यावरही होत आहे. 
 

तऱ्हाडी (धुळे) : वाढत्या शहरीकरणात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. या सिमेंटच्या जंगलात हिरवीगार झाडांची वनराई लुप्त झाली असून, इमारतीतील वृक्षांची जागा आता मोबाईल टॉवरने घेतली आहे. मोकळी जागा असो वा टेरेसवरच्या जागेवर महिन्याकाठी मिळणाऱ्या मोबदल्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्यात नागरिकांचा कल वाढत आहे. दिवसेंदिवस या टॉवरच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, यामधून निघणाऱ्या रेडिओ ॲक्‍टिव्ह लहरींचा पर्यावरणावर घातक परिणाम होऊन अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 
शहरातील पक्ष्यांचा किलबिलाट शांत झाला आहे. घरातील फोटोमागे घरटे करून राहणारी चिमणी नामशेष होत आहे. त्या लहरींचा पर्यावरणावर जेवढा परिणाम होत आहे तेवढाच मानवी आरोग्यावरही होत आहे. 
उंच इमारतींना टॉवर बसविण्यासाठी पसंती दिली जात आहे. शहरात मोबाईल टॉवरच्या संख्येत वाढ झाल्याने त्यामधून निघणाऱ्या रेडिओ ॲक्‍टिव्ह लहरींचे उत्सर्जन वाढले आहे. यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे जाणवते. नवीन झालेल्या वसाहतीत अनेक मोबाईल कंपनी टॉवर उभारण्यासाठी आग्रही असतात. मात्र महिन्याकाठी काही न करता भाडेरूपात मिळणाऱ्या २० ते २५ हजार रुपयांसाठी इमारतीवर टॉवर बसविण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते. एका उंच इमारतीची निवड करून हा टॉवर इमारतीच्या गच्चीवर बसविला जातो. 
मोबाईल टॉवर, जनरेटर सेट, बॅटरी असा अंदाजे तीन ते चार टन वजनाचा अतिरिक्त भार लादला जातो. यासाठी लागणारी वीज मालकांकडून घेतली जाते. वेगळा खर्च करावा लागत नाही, शिवाय रहिवासी जागेत असल्याने सुरक्षारक्षकाची गरज भासत नाही. त्याचा थोडाफार मोबदला मालकाला दिला जातो. मोकळ्या जागेत टॉवरला जागेचे भाडे, उंच टॉवर उभारण्यासाठी लागणारा खर्च, सुरक्षारक्षक असा वाढता खर्च कमी करण्यासाठी मोबाईल कंपन्या इमारतींना प्राधान्य देतात. 
 
चिमणी, कावळे नामशेष 
टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ ॲक्‍टिव्ह लहरींचा पर्यावरणावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. आधी दिसणारा चिमण्या, कावळे यांचा थवा आता दिसेनासा झाला. परिणामी पर्यावरणप्रेमी चिमणी दिवस साजरा करीत पर्यावरण संवर्धनाचे काम करतात. पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाल्याने नैसर्गिक पद्धतीने होणारे झाडांचे रोपण घटले आहे. झाडावर असलेली पक्ष्यांची घरटी मोडकळीस आली आहेत. 
 
मानवी स्वास्थ्य बिघडले 
मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या घातक लहरी सदैव ॲक्‍टिव्ह असतात. डोळ्याने दिसत नसल्या तरी कालांतराने होणारे त्याचे परिणाम मानवी जीवनावर दिसतात. टॉवरमधून निघणाऱ्या लहरी तुमच्या घरात असणाऱ्या मोबाईलसोबत जोडलेल्या असल्याने वापरतील मोबाईल फोन शरीरापासून दूर ठेवावा. छातीजवळ, डोक्‍याजवळ, खिशात ठेवल्याने मांडीजवळ सतत मोबाईल ठेवल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, डोके जड होणे, डोळ्यांची जळजळ, लहरींचा मांसपेशींसोबत संपर्क आल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत होत असल्याचे वैज्ञानिकांनी प्रयोगाअंती सिद्ध केले असून, तज्ज्ञ डॉक्‍टरांनी याला दुजोरा दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news illegal mobile tower in building