esakal | धुळ्यातील पहिला प्रकल्प; केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजननिर्मिती सुरू

बोलून बातमी शोधा

dhule oxygen plant

धुळ्यातील पहिला प्रकल्प; केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजननिर्मिती सुरू

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : येथील रेल्वे स्टेशन रोडवरील आणि जिल्हा न्यायालय परिसरातील केशरानंद हॉस्पिटलने रविवारी (ता.२५) मेडिकल ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. याव्दारे रोज ६० सिलिंडर ऑक्सिजन मिळणार असून आयसीयूमधील नऊ आणि ऑक्सिजनयुक्त १५ खाटा, असे मिळून एकूण २४ खाटांना ही सुविधा मिळू शकेल. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर खासगी वैद्यकीय क्षेत्रात धुळे शहरात असा प्रकल्प कार्यान्वित करणारे केशरानंद हॉस्पिटल पहिले ठरले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प आठ दिवसांत उभारला. या प्रकल्पातून रोज ६० सिलिंडर ऑक्सिजन मिळेल. त्यामुळे गरजू रुग्णांना लाभ होईल, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी दिली. महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांना ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी उद्युक्त करावे, असे सूचना देणारे राज्य सरकारचे पत्र येथील महापालिका प्रशासनालाही प्राप्त झाले आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा

कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढत असल्याने मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. जिल्ह्याला रोज सरासरी ३२ ते ३५ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यासाठी १६ टनांचे दोन टँकर रोज मिळत आहेत. हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयास रोज एक टँकर, तर उर्वरित दुसऱ्या १६ टनाच्या टँकरद्वारे अन्य सर्व रुग्णालयास ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही किंवा तिसरी लाट येण्याची शक्यता उद्‌भवली तर ऑक्सिजनची मागणी वाढेल. त्यानुसार जिल्ह्याला वाढीव सरासरी १५ ते १८ टन ऑक्सिजनची म्हणजेच एकूण ५० टन पुरवठ्याची गरज भासेल. आताच ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यात वाढीव गरज भागवायची असेल तर शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याशिवाय गत्यंतर नसेल. यासाठी त्यांना प्रकल्प उभारणीचे आवाहन झाले.

केशरानंद हॉस्पिटलचा प्रतिसाद

केशरानंद हॉस्पिटलने आवाहनाला प्रतिसाद देत युद्धपातळीवर हवेतून ऑक्सिजननिर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प आठ दिवसांत सुरू केला आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण ६० खाटा आहेत. पैकी ४५ ऑक्सिजनयुक्त खाटा व त्यात नऊ आयसीयूमधील खाटा समाविष्ट आहेत. पंधरा खाटा सर्वसाधारण रुग्णांसाठी आहेत. आयसीयूमधील खाटांना तिपटीहून अधिक ऑक्सिजन लागतो. त्यामुळे सरासरी २४ खाटांना ऑक्सिजनची सुविधा मिळत राहील, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले. यंत्राचे श्री. भामरे, डॉ. बोरसे, हेमलता महेंद्र बोरसे यांच्या हस्ते रविवारी पूजन झाले. राजेंद्र देसले, जीतूभाई शहा, लाइफलाइन ऑक्सिजन कंपनीचे मालक अनिल अग्रवाल, माजी नगरसेवक रविराज भामरे आदी उपस्थित होते.

विजेबाबत सुविधानिर्मिती

ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय नको म्हणून केशरानंद हॉस्पिटलमध्ये सौरउर्जेवर आधारित बॅक- अप प्रकल्प, वीज सुरळीत राहण्यासाठी ३२ केव्हीचे जनरेटर लवकरच उपलब्ध करत असल्याचे ज्ञानेश्‍वर भामरे यांनी सांगितले.