esakal | बिबट्याच्या पंजाचे ठसे..भीतीने खामखेडा शिवार ओस
sakal

बोलून बातमी शोधा

leopard-paw-prints

बिबट्याच्या पंजाचे ठसे..भीतीने खामखेडा शिवार ओस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिरपूर (धुळे) : तालुक्यातील खामखेडा प्र. थाळनेर परिसरात बिबट्याचा (leopard) मुक्त वावर दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतांमधील सालदारांनी पळ काढला तर दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत. जिवाच्या भीतीने शेतकरी शेतांकडे जात नाहीत त्यामुळे त्यामुळे ऐन कापूस लागवडीच्या हंगामात (Farmer cotton planting season) खामखेडा शिवार ओस पडले आहे. (leopard-paw-prints-khamkheda-shivar-camera)

खामखेडा शिवारात २१ मेस बिबट्याचे दर्शन घडले. प्रारंभी दिसलेला प्राणी बिबट्या आहे की तरस याबाबत शंका होती. शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनसंरक्षक आनंद मेश्राम, वनसंरक्षक संदीप मंडलिक, वनरक्षक वैशाली कुंवर, ज्ञानेश्वर शिरसाठ, नेचर कंझर्वेशन फोरमचे प्राणीमित्र योगेश वारुडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाऊलखुणा तपासल्या असता या भागात बिबट्याचा संचार असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा: साक्रीत पेट्रोल शंभरी पार

शेतातील वस्‍तीही उठली

उसाच्या शेतामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे कळताच परिसरात घबराट पसरली. शेतांमध्ये वस्ती करून राहणाऱ्या सालदारांनी कुटुंबासह पळ काढला. कापूस लागवड सुरू असलेल्या शेतांमध्ये बिबट्याच्या भीतीने मजूर जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जिवाची भीती असल्याने खुद्द शेतमालकानाही शेतात पाणी भरण्यासाठी, मशागतीसाठी जाता येत नसल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

गस्‍त घालण्यासाठी पथक

शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र पिंजरा लावण्यासाठी वन विभागाचे स्वतंत्र निकष आहेत. जिल्हा स्तरावरून परवानगी मिळाल्याशिवाय पिंजरा लावता येत नाही. याबाबत वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून खामखेडा परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले असून सकाळी व सायंकाळी गस्त घालण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. मात्र या उपाययोजना तोकड्या असून शेतकऱ्यांना जीवाची हमी देण्यात वनविभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतमालकांनी दिली. जीवाची जोखीम घेऊन शेतांमध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: कापडणे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी केली दुप्पट

संचार वाढताच

दरम्यान २४ मे पर्यंत बिबट्याचा वावर प्रमुख्याने खामखेडा शिवारात सागर पाटील यांच्या उसाच्या शेताच्या परिसरात असल्याचे दिसून आले. मात्र मंगळवारी (ता. २५) खामखेडा ते टेकवाडे रस्त्याच्या मध्यापर्यंत बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या. त्यामुळे बिबट्याच्या संसाराचे क्षेत्र वाढीस लागल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर खामखेडासह टेकवाडे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शेतामधील पाळीव गुरे शेतकऱ्यांनी गावात नेली, मात्र त्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्न आहे त्यातच अभ्राच्छादित वातावरण असल्याने कधीही पाऊस येईल अशी शक्यता आहे. सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली असून या समस्येतून वन विभागाने ठोस मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

जंगलातून गावात

यापूर्वी मार्चमध्ये वाडी (ता. शिरपूर) येथील वन हद्दीलगत शेतात बिबट्या आढळला होता. त्याने थेट वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरच झेप टाकली होती. महत्प्रयासाने त्याला पुन्हा जंगलाकडे हुसकावून लावण्यात आले होते. जंगल नष्ट होत असल्यामुळे लहान वन्यप्राणी शिकारीसाठी उपलब्ध होत नसल्याने बिबट्यांनी शेतशिवारांकडे मोर्चा वळवल्याची शक्यता आहे. खामखेडा येथील पंज्याच्या ठश्यावरून बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो नर किंवा मादी असल्याचे कळू शकले नाही.

ऊसाची लागवड असलेल्या शेतात बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे सालदार पळून गेला. गुरे घरी न्यावी लागली. कापूस लागवडीसाठी मजूर येत नाहीत. महागडे बियाणे, खाते घेऊन पडली आहेत,त्यांचे काय करावे ? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिस्थितीची दखल घ्यावी.

- सचिन पाटील, शेतकरी, खामखेडा