esakal | वीज बिलांसाठी अडवणूक; शेतकरी, वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी 
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran

वीज वितरण कंपनीकडून रोहित्र दुरुस्ती न करता शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे. ऐनवेळी एवढा पैसा कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली.

वीज बिलांसाठी अडवणूक; शेतकरी, वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नेर (धुळे) : नादुरुस्त रोहित्र दुरुस्त न करता कृषी धोरणाच्या नावाने शेतकऱ्यांकडून अवेळी वीजबिलाची वसुली केली जात आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नेर येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन रोहित्र दुरुस्तीची अभियंता भटु सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून त्वरित रोहित्र दुरुस्त करून पिके येईपर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यामुळे शेतकरी आणि वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज अभियंत्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

वीज वितरण कंपनीकडून रोहित्र दुरुस्ती न करता शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे. ऐनवेळी एवढा पैसा कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. या वेळी शेतकरी आणि वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने कृषी धोरणाच्या नावाने अवेळी शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्याचे छडयंत्र रचले आहे. शेतकऱ्यांनी आपली सर्व जमापुंजी पीक संवर्धनासाठी वापरलेली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा केल्याने रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहे. नवीन रोहित्रासाठी वीजबिले भरण्याचे सांगितले जात आहे. परंतु शेतकऱ्यांकडे सद्या पैसे नसून माल निघाल्यानंतर बिल भरू तोपर्यंत सवलत देऊन नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर सतीश बोढरे, कैलास माळी, विठ्ठल गवळे, भगवान माळी, रवि गवळे, तुषार सैदाणे या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.