esakal | सुयोग्य जोडीदार शोधताय तर सावधान; होवू शकते अशी फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

मुली मिळत नसल्याने दलालामार्फत राज्यातील मागास भागातील मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्नही यशस्वी होत नसून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने अनेक विवाहेच्छूक युवकांनी तो मार्गही टाळला आहे.

सुयोग्य जोडीदार शोधताय तर सावधान; होवू शकते अशी फसवणूक 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : वर- वधूचे स्थळ शोधण्यासह लग्न जुळवताना सोयीस्कर ठरावे, यासाठी वधू- वर परिचय मेळावा, सोयरीक जोडणाऱ्या संस्था पुढे आल्या आहेत. पण खरचं सुयोग्य जोडीदार मिळतो का, हा प्रश्न आहे. संबंध विच्छेद होण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहचले आहेत. दरम्यान शेतकरी, लहान- मोठे व्यावसायिक, शेतमजूर, कामगार युवकांना मुली मिळत नसल्याने त्यांना लुटणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. 
मुली मिळत नसल्याने दलालामार्फत राज्यातील मागास भागातील मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्नही यशस्वी होत नसून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने अनेक विवाहेच्छूक युवकांनी तो मार्गही टाळला आहे. काही गावांनी व पालकांनी दलालामार्फत मुलींचे असे विवाह नाकारण्याचे धोरण अवलंबिले आहे. 

अविवाहित तरुणांच्या संख्येत दिवसागणिक वाढ 
आजही मुलामुलींमध्ये भेद पाळले जात असल्याने राज्यात हजार पुरुषात ८७४ स्त्रिया असे प्रमाण झाले आहे. परिणामी गावोगावी अविवाहित युवकांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. अशा युवकांना परजातीतील गरीब घरातील विशेषतः: राज्याच्या सीमेवरील गावातील मुली मिळवून देणाऱ्या दलालांचा व्यवसाय फोफावला आहे. वधू मिळविण्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागत आहे. लग्नाच्या व्यवहारात काही प्रामाणिक तर अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. प्रत्येक समाजात विशेषतः: उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजात मुलींची संख्या कमी असून प्रत्येक गावात प्रत्येक समाजात सरासरी ३५ युवक अविवाहित आहेत. अनेक युवकांचे लग्नाचे वयही टळले आहे. नोकरदार वगळता लहान व्यावसायिक, कारागीर, मजूर, शेतकरी युवकांना वधू मिळणे कठीण झाले असून परिस्थिती गंभीर झाल्याने अशा युवकात अस्वस्थता पसरली आहे. कुटुंब व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. प्रेमविवाहाचे प्रकार वाढत असून मुले मुली पाळण्याचे प्रकार समाज विघातक ठरत आहेत. 

अशी होते फसवणूक 
विवाहोत्सुक पण छोटे व्यावसायिक, कारागीर आदी युवकांचे किंवा पालकांचे मोबाईल क्रमांक वधू- वर परिचय पुस्तकातून मिळवून त्यांना सोशल मिडीयावर मुलीचे छायाचित्र, नाव, शिक्षण व जातीचा उल्लेख असलेला मॅसेज पाठविला जातो. या मुलीला तुमचे स्थळ पसंत असून पुढील माहिती व संवादासाठी आधी चार हजार रुपये अकाउंटमध्ये टाका. अकाउंट नंबर दिला जातो. मुलगी मिळणार या अपेक्षेने अनेक पालक दिलेल्या खात्यात चार हजार भरतात. पण पुढे फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे