मुस्लिम शेतकऱ्याची चर्चा: मंदिर बांधून महादेवाच्या पिंडीसह केली नंदीची प्राणप्रतिष्‍ठा

जगन्नाथ पाटील
Monday, 8 February 2021

पस्तीस फूट उंचीचे मंदिर बांधून रंगकाम झाले. त्यानंतर शोभायात्रा काढत मूर्तींची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. मंदिरात केवळ बैलाचीच मूर्ती बसविली, असे नाही. तर महादेवाची पिंड आणि देवी पार्वतीची मूर्तीही प्रतिष्ठापित केली आहे. केवळ मूर्तींसाठी लाखावर खर्च झाला आहे. 

कापडणे (धुळे) : विविध प्रकारच्या मंदिरांसाठी देणगी देणाऱ्यांची कमी नाही. स्वखर्चाने देवदेवतांची मंदिरे बांधणारेही कमी नाहीत. आई-वडिलांच्या स्मृतीसाठी मंदिरे उभारली जातात. पण बिलाडी (ता. धुळे) येथील पिंजारी मुस्लिम समाजातील शेतकऱ्याने अकाली निधन पावलेल्या बैलाच्या स्मृतीसाठी चक्क साडेसात लाखांचे मंदिरे उभारले अन् बैलाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून देवत्व बहाल केले. विशेष म्हणजे मंदिर बांधणे ही वडिलांची इच्छाही पूर्ण केली. या मुस्लिम शेतकऱ्याची खानदेशात चर्चा सुरू आहे. 
पस्तीस फूट उंचीचे मंदिर बांधून रंगकाम झाले. त्यानंतर शोभायात्रा काढत मूर्तींची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. मंदिरात केवळ बैलाचीच मूर्ती बसविली, असे नाही. तर महादेवाची पिंड आणि देवी पार्वतीची मूर्तीही प्रतिष्ठापित केली आहे. केवळ मूर्तींसाठी लाखावर खर्च झाला आहे. 

हे एकतेचे दर्शनच म्‍हणावे
मुस्लिम शेतकऱ्याने हिंदू मंदिर उभारल्याने माणुसकीचा, समतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. शेतकरी पिंजारी यांच्या विधायकतेचे परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान, मंदिर बांधण्यासाठी जुन्या धुळ्यातील विलास फुलपगारे यांनी जागा उपलब्ध करून दिली. ग्रामस्थांनी मिरवणूक आणि प्राणप्रतिष्ठेला भव्यदिव्यतेचे स्वरूप दिल्याने येथे सामाजिक एकतेचे दर्शन घडले. 
 
ये तो अब्बा की ख्वॉईश 
बिलाडी येथील अल्लाउद्दीन पिंजारी यांच्या जिवलग बैलाचा वीस वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला. त्यांचे वडील सांडू पिंजारी यांनी हिंदू प्रथेनुसार अंत्ययात्रा काढत शेतात दफनविधी केला होता. त्या बैलाचे मंदिर बांधण्यांची त्यांची तीव्र इच्छा वीस वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. त्यासाठी तब्बल साडेसात लाख खर्च केले. अब्बा की ख्वाईश पूर्ण झाली, हेच समाधान असल्याचे अल्लाउद्दीन पिंजारी यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news muslim farmer create shiv temple