संशयितांवर कारवाई नसल्याने गृहस्‍थ थेट मोबाईल टॉवरवर; चार तास चालले नाट्य

रमाकांत घोडराज
Tuesday, 26 January 2021

सहा जणांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी वेळोवेळी पोलीसांकडे तक्रार केली, स्मरणपत्रे दिली होती. त्याची दखल घेतली जात नाही, असा समज झाल्याने तोलाणींनी पोलीस अधीक्षकांच्या नावेही तक्रार अर्ज व स्मरणपत्र देत उपोषणाचा इशाराही दिला होता.

धुळे : पोलिसात दाखल गुन्ह्यात एका नगरसेविका पतीसह इतरांवर कारवाई होत नसल्याने शहरातील साक्री रोडवरील कुमार नगरमधील एकजण सिंचन भवनमागील मोबाईल टॉवरवर चढून गेला. सरासरी चार तास ही व्यक्ती टॉवरवरुन उतरली नाही, त्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर ही व्यक्ती टॉवरवरून खाली उतरली. आंदोलनस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. 
कुमारनगर भागातील (ब्लॉक नंबर-डी- ३, रूम नंबर- ७) सुरेश नानुमल तोलाणी (वय ५३) यांनी गुलशन उदासी, कमलेश उदासीसह इतर पाच ते सहा जणांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी वेळोवेळी पोलीसांकडे तक्रार केली, स्मरणपत्रे दिली होती. त्याची दखल घेतली जात नाही, असा समज झाल्याने तोलाणींनी पोलीस अधीक्षकांच्या नावेही तक्रार अर्ज व स्मरणपत्र देत उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र उपोषण न करता तोलाणी सोमवारी (ता. २५) सकाळी मोबाईल टॉवरवर चढून गेले. त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. 

चार तास चालले नाट्य
तोलाणी यांनी टॉवरवर दोन ठिकाणी बॅनरही लावले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन व महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी तोलाणींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चार तास हे नाट्य सुरू होते. योग्य कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने तोलाणी टॉवरवरून खाली उतरले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, सहकारी अधिकारी नाना आखाडे, मुख्तार मन्सुरी, सी. एस. पाटील, राहुल गिरी आदींसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागुल, गोविंद लुंडाणी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news no action on suspects and person mobile tower