esakal | विकासात पिछेहाट..धुळ्याची गती मंदावली! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

शहराला विकासाचा चेहरा लाभला असे नाही, तर मूलभूत आणि गरजेनुसार वेगवेगळ्या समस्यांचे जलद निराकरण झाले नाही, तर तो सर्वांगीण विकास ठरू शकत नाही.

विकासात पिछेहाट..धुळ्याची गती मंदावली! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : विविध नागरी समस्यांच्या जंजाळ्यात अडकल्याने आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची कुणाचीही मानसिकता नसल्याने धुळे शहराची विकासात्मक गती मंदावली आहे. शेजारील शिरपूर, नंदुरबार, मालेगावसारखी शहरे विकासाकडे झेप घेत असताना धुळे शहराची मात्र पीछेहाट होत आहे. 
केवळ कोट्यवधींच्या निधीतील विकास योजना अमलात आल्या म्हणजे शहराला विकासाचा चेहरा लाभला असे नाही, तर मूलभूत आणि गरजेनुसार वेगवेगळ्या समस्यांचे जलद निराकरण झाले नाही, तर तो सर्वांगीण विकास ठरू शकत नाही. अशा कात्रीत सध्या धुळे शहर सापडले आहे. या-ना-त्या कारणाने राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पातळीवर ‘कर्तबगार’ अशी पालुपदे मिरविणारे पिण्याचे पाणी, पार्किंग, रस्ता रुंदीकरण, पथदिवे, खड्डे व रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण, नित्याचीच वाहतुकीची कोंडी व त्यासंबंधी वाढते चौक, सिग्नल, ट्रॅफिक सेन्स व कायद्याचा धाक आदींसारखे महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकत नसल्याने धुळे शहर बकालपणाच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. 

धुळे शहराची वाताहत का? 
महापालिकेसह नेत्यांचे शहरातील जटिल पिण्याचे पाणी, पथदिवे, स्वच्छता, खड्डे व रस्ते दुरुस्ती, निमुळत्या रस्त्यांमुळे पार्किंग, रस्ता रुंदीकरण, रस्त्याच्या दुतर्फा वाढते अतिक्रमण, ट्रॅफिक सेन्स व कायद्याचा धाक आदी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शहराला बकाल रूप प्राप्त होऊ लागले आहे. नेत्यांच्या अशा उदासीन भूमिकेमुळे अधिकारी सुस्त दिसतात. त्यामुळे धुळे शहराचा कारभार ‘रामभरोसे’ चालल्याची अनुभूती येत आहे. 

तेथे मॉल, धुळ्यात नाही 
शहरातील पालिकेचे २००३ ला महापालिकेत रूपांतर झाले. त्यामुळे धुळे शहराला महानगराचे रूप प्राप्त होईल, असे वाटू लागले. शिरपूर, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक या शहरांनी टप्प्याटप्प्याने नियोजित कारभारातून आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार शासकीय निधी खेचून आणत विकासाकडे झेप घेतली. तेथे मॉल झालेत, पण धुळे शहरात होऊ शकत नाही, याचे अनेकांना वैषम्य आहे. तीन राष्ट्रीय महामार्गांलगत वसलेले आणि शहरामधून वाहणाऱ्या नदीचे भाग्य लाभल्याने धुळे शहर कात टाकेल आणि विकासाकडे झेप घेईल, पांझरा बारमाही होऊन सौंदर्यात भर पडेल, असे शहरवासीयांना वाटू लागले. मात्र, गेल्या १७ वर्षांत सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी या अनुषंगाने महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्यांनी धुळेकरांचा सपशेल भ्रमनिरास केला. नागरी विकासाऐवजी अनेकांनी वैयक्तिक हित साधत महापालिका अक्षरशः ओरबाडून काढली. तिचे आर्थिक लचके तोडले. 
(क्रमशः) 


संपादन ः राजेश सोनवणे