esakal | धुळ्यातील एक गाव असेही..जेथे प्रत्‍येक घरातील एक व्यक्‍ती करतेच एकच काम; म्‍हणून बेरोजगारी नष्‍ट
sakal

बोलून बातमी शोधा

one village one work

प्रत्येक घरातील किमान एक जण घराच्या फरशी बसविण्यासह फरशीसंदर्भातील सर्व काम करीत असून गावातील बेरोजगारी नष्ट केली आहे. 

धुळ्यातील एक गाव असेही..जेथे प्रत्‍येक घरातील एक व्यक्‍ती करतेच एकच काम; म्‍हणून बेरोजगारी नष्‍ट

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : प्रत्येक गावाची एक विशिष्ट ओळख असते. किल्ला, धरण, प्रमुख मंदीरे, रेल्वेस्टेशन, बाजारपेठेचे गाव एवढेच नव्हे तर सैनिकांचे गाव, पुढाऱ्यांचे गाव अशीही तालुक्यात काही गावांची ओळख आहे. पण धुळे तालुक्यात एक गाव असे आहे की तेथील प्रत्येक घरातील किमान एक जण घराच्या फरशी बसविण्यासह फरशीसंदर्भातील सर्व काम करीत असून गावातील बेरोजगारी नष्ट केली आहे. 

पदवीधर असूनही नोकरीच्या मागे न लागता त्यांनी फरशी बसविण्यापासून विक्रीपर्यंत व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून आर्थिक प्रगती तर साधलीच पण बाहेरगावच्या आपल्या नातेवाईकांना बोलावून व फरशीकाम शिकवत त्यांचीही बेरोजगारी दूर केली आहे. फरशीकाम करणाऱ्या सर्वांचे टोलेजंग घरे बांधली गेली आहेत. त्यामुळे नोकरीसह अन्य काम करण्यास कोणी तयार नाही; अशी स्थिती आहे. या गावाचे नाव 'वरखेडा' (ता. धुळे) आहे. हे गाव आता धुळ्याचे उपनगर झाले आहे.

असा वाढला व्यवसायाचा वसा
साधारण 35 ते 40 वर्षांपूर्वी मुलजीभाई नामक एक राजस्थानी गृहस्थ धुळ्याला फरशी बसविण्याचा ठेका घेत असे. त्यांच्याकडे वरखेड्याचे मोगल पिंजारी कामाला होते. पुढे पिंजारी स्वतः ठेका घेऊ लागले आणि गावातील काही मुलांना कामावर ठेवले. पुढे रामदास मिस्तरी यांनी व्यवसाय वाढविला. हळूहळू कारागीर वाढत गेले. गावाची लोकसंख्या दहा हजारापर्यंत असून सुमारे तीन हजार जण फरशी काम करतात. त्यात 15 वर्षांच्या मुलांपासून 70 वर्षांचे म्‍हातारेही आहेत. 

शेती असूनही करेनात
शेती आहे पण फारसे कोणी करीत नाही. कारण फरशी कारागीर 900 ते 1000 रुपये रोज कमावतो. त्यात केवळ मजुरी करणाऱ्यास 400 रुपये रोज आहे. ठेकेदारांकडे अनेक कारागीर असून एका कारागीराच्या मागे दीडशे ते 200 रुपये कमावतो. म्हणून इतर व्यवसाय सहसा कोणी करीतच नाही. अशी माहिती अनिल निकम, किरण चौधरी या कारागीरांनी दिली. 

अन्य कामेही सफाईदार
फरशी, टाईल, स्पारटेकसह सर्व आधुनिक फरशी बसविणे, घासणे, किचन ओटा, भांडी ठेवण्यासाठी रॅक, अल्युमिनिअम सेक्शन, किचन ट्राली, चायना मोझेक, घराची पुढील भिंत रंगीबेरंगी लहान फरशींनी सजवणे आदी सर्व कामे सफाईदार पध्दतीने करतात. त्यामुळे कारागीरांना खूप मागणी असते. एवढेच नव्हे तर येथील कारागीरांनी धुळे जिल्हासह औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, गोवा, चेन्नई, गुजरात, मध्यप्रदेश आदी ठिकाणीही कामे केली असून अजूनही बोलावले जाते. कोणतेही काम वाईट नसते. नोकरीच्या मागे न लागता प्रामाणिकपणा, चिकाटीने काम केल्यास यश निश्चित आहे हे वरखेडेकरांनी दाखवून दिले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे