esakal | मृत गर्भ काढल्‍यानंतर महिलेचे जगणेही नव्हते शक्‍य; अनेक डॉक्‍टरांचा होता नकार पण
sakal

बोलून बातमी शोधा

Doctors

ऑपरेशन करून मृत बाळ बाहेर काढत गर्भासह गर्भपिशवी काढून टाकली. शस्त्रक्रिया करूनही रक्तस्राव थांबत नसल्याने डॉक्टरांनी धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला. 

मृत गर्भ काढल्‍यानंतर महिलेचे जगणेही नव्हते शक्‍य; अनेक डॉक्‍टरांचा होता नकार पण

sakal_logo
By
विनोद शिंदे

कुसुंबा (धुळे) : अतिरक्तस्रावाने, असहाय वेदनेने विव्हळत अमळनेर येथील महिला रात्री साडेबाराला रुग्णवाहिकेने धुळ्यात दाखल होते, तिची गंभीर परिस्थिती पाहता कोणीही डॉक्टर अॅडमिट करून घ्यायला तयार नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून देवपूर परिसरातील 
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपर्क करताच स्त्रीरोगतज्‍ज्ञ व प्रसूती विभागाच्या डॉ. वैशाली पाटील यांनी रुग्णाची चाचपणी करून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ अॅडमिट करून उपचार सुरू केले अन्‌ महिलेचे प्राण वाचले. यामुळे महाले परिवारासाठी डॉ. वैशाली पाटील अक्षरशः देवदूत ठरल्या. 
अमळनेर येथील सपना मुकेश पाटील या आठ महिने गर्भवती महिलेच्या पोटात गेल्या आठवड्यात अचानक वेदना व्हायला लागल्याने अमळनेर येथीलच एका खासगी दवाखान्यात अॅडमिट केले. मात्र तेथे गर्भाचे ठोके मिळत नसल्याने गर्भ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशन करून मृत बाळ बाहेर काढत गर्भासह गर्भपिशवी काढून टाकली. शस्त्रक्रिया करूनही रक्तस्राव थांबत नसल्याने डॉक्टरांनी धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला. 

नातलगांनी आशा सोडली होती
रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहता धुळ्यात कुणीही अॅडमिट करून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सुधा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्‍या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली पाटील व डॉ. मिलिंद पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाच्या पोटातून रक्ताच्या गाठी बाहेर काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. रक्तस्राव थांबवून रुग्णाचे प्राण वाचविले. नातेवाइकांनी आपले पेशंट वाचत नाही, असे म्हणून आशा सोडली होती, मात्र डॉ. पाटील महाले परिवारासाठी अक्षरशः देवदूतच ठरल्याच्या प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिल्या. यासाठी डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. ललित पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले व पेशंट अॅडमिट करून घेण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे व धुळे जिल्‍हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले. 
 
अतिरक्तस्रावामुळे पत्नीची प्रकृती खालावत होती. अशा परिस्थितीत धुळ्याला कुणीही अॅडमिट करून घेत नव्हते. रात्री थंडीत आम्ही विनवण्या करीत होतो, मात्र डॉ. वैशाली पाटील यांनी यशस्वी उपचार करून पत्नी सपनाला ठणठणीत केले. डॉ. पाटील आमच्या कुटुंबीयांसाठी अक्षरशः देवदूतच ठरल्या आहेत. 
- मुकेश पाटील, रुग्णाचे पती, अमळनेर 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image