esakal | रात्रीचा डिजे वाजला, पोलिस आले अन्‌ झाली पंचाईत; मालकांसह आयोजकांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

ban dj

पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत डिजेच्या धुंदीत नाचणाऱ्यांची नशा उतरेल अशी अपेक्षा आहे. 

रात्रीचा डिजे वाजला, पोलिस आले अन्‌ झाली पंचाईत; मालकांसह आयोजकांना दणका

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना व उच्च न्यायालयाने वाद्य वाजविण्याबाबत अटी घालून दिलेल्या असताना या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसांना शहरात कार्यक्रमांच्या आयोजकांसह डिजे मालकांना दणका दिला. वाहनांसह डिजेचे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत डिजेच्या धुंदीत नाचणाऱ्यांची नशा उतरेल अशी अपेक्षा आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धुळे शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. तसेच उच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई केली आहे. या आदेशांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री दहानंतरही वाद्य वाजवून शांतता भंग करणाऱ्या डिजे मालक व कार्यक्रम आयोजकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. काल (ता.९) रात्री पेट्रोलिंगदरम्यान धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला शहरातील सुरत बायपास चंद्रदिप हॉटेल परिसर, सिंचन भवनाच्या मागे व जमनागिरी रोड परिसरात विहित वेळेनंतरही नियम भंग करून वादय वाजत असल्याचे निर्दशनास आल्याने पथकाने वाहनांसह संबंधित वादय व डिजे साऊंड सिस्टीम (एकूण दोन डिजे, दोन स्पिकर अँम्प्लीफायर, दोन ४०७ चारचाकी वाहन) जप्त केले. 

यांच्यावर कारवाई 
संबंधित कार्यक्रमाचे आयोजक संतोष चैत्राम बागले (रा. तुळजाई सोसायटी, साक्री रोड धुळे) व सागर परदेशी (रा.सिंचन भवनामागे धुळे) तसेच वादय डिजे स्पीकर मालक मयूर विलास चौधरी (वय-२४ रा. संतोष नगर वाडीभोकर देवपूर, धुळे) व नितेश जोगीराज पाटील (वय-२८ रा. महिंदळे साक्री रोड, धुळे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्री. पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्री. बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, मुक्‍तार मन्सुरी, मच्छींद्र पाटील, योगेश चव्हाण, राहुल पाटील, निलेश पोतदार,तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, वसंत कोकणी, जवाहर पवार, किरण भदाणे, सचिन पगारे, होमगार्ड महेंद्र चौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 
 
गोंगाटाचा वैताग 
कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या वाजंत्री व्यवसायाला अटी-शर्तींवर परवानगी दिली खरी पण याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रचंड मोठ्या आवाजात डिजेसह इतर वाद्य वाजविले जातात. आवाजाच्या दणक्याने त्या-त्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही मोहीम निश्‍चितच दिलासा देणारी ठरणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे