
पोलिसांच्या पथकाने ६ क्विंटल ७५ किलो अफूची बोंडे व हिरवी झाडे असा सुमारे १३ लाख एकतीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर पोलिस स्टेशन हद्दीतील भामेर (ता. साक्री) शिवारात आज (ता. १८) दोन ओसाड व डोंगराळ ठिकाणावरच्या लगतच्या शेतांमध्ये अवैधरीत्या सुमारे २ ते ५ फूट उंचीच्या अफू पिकाची बेकायदेशीर लागवड केलेली आढळून आल्याने महसूल व कृषी विभागाच्या अधिकारांच्या उपस्थितीत निजामपूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
नायब तहसीलदार व्ही. डी. ठाकूर, मंडळाधिकारी विजय बावा, तलाठी प्रशांत माळी, कृषी सहाय्यक मीनाक्षी वाघ आदी यावेळी उपस्थित होते. निजामपूर पोलिसांच्या पथकाने ६ क्विंटल ७५ किलो अफूची बोंडे व हिरवी झाडे असा सुमारे १३ लाख एकतीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुकुंदा हसन जाधव (वय-५८, रा.भामेर) व अशोक एलजी निकुंभ (वय-५५, रा.भामेर) अशी संशयितांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकात सहाय्यक निरीक्षक शिरसाठ यांच्यासह हवालदार कांतीलाल अहिरे, आशिष कांगणे, सुधाकर शेंडगे, भटू पाटील, नरेंद्र माळी, जाधव, अवधूत होंडे आदींचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
दोन क्विंटल मुद्देमाल जप्त
मुकुंदा जाधवच्या शेतात सुमारे दहा लाख रुपये किमतीचा जवळपास ५ क्विंटल मुद्देमाल हस्तगत झाला. तर अशोक निकुंभच्या शेतात सुमारे साडेतीन लाखावर किमतीचा जवळपास २ क्विंटल मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी राज्यात बंदी असतानाही मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफूची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. सहाय्यक फॉरेन्सिक विश्लेषक शशिकांत अहिरे, चालक मिस्तरी यांनी मुद्देमालाची अधिकृत घोषणा केली.
संपादन ः राजेश सोनवणे