esakal | तब्बल ४९ दिवसांनी धरणे आंदोलन समाप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

ramai gharkul sheme

विविध मागण्यांसाठी श्री. दामोदर यांच्या नेतृत्वात ४ जानेवारीपासून साक्री रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात महापालिकेशी निगडित मागण्यांसाठी महापालिकेतही आंदोलन करण्यात आले होते. 

तब्बल ४९ दिवसांनी धरणे आंदोलन समाप्त 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : रमाई घरकुल योजनेच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन मागण्या मान्य झाल्याने सोमवारी (ता. २२) ४९ व्या दिवशी समाप्त केल्याची घोषणा माता रमाई घरकुल लाभार्थी संघर्ष समितीचे निमंत्रक वाल्मीक दामोदर यांनी केली. 
विविध मागण्यांसाठी श्री. दामोदर यांच्या नेतृत्वात ४ जानेवारीपासून साक्री रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात महापालिकेशी निगडित मागण्यांसाठी महापालिकेतही आंदोलन करण्यात आले होते. 
पूर्णवेळ अधिकारी देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हर्षदा बडगुजर यांच्याकडे सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, धुळे) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. श्रीमती बडगुजर यांनी आंदोलनाच्या अनुषंगाने शिष्टमंडळाशी चर्चा केली. रमाई घरकुल योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेत लाभार्थी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे संयुक्त खाते उघडण्याची कार्यवाही करण्यात येईल, नवीन स्वाक्षरीचा नमुना संबंधित बँकेत देत खाते अद्ययावत केले आहे. तसेच महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे, मृत लाभार्थ्यांचे वारस लावण्यासाठी तातडीने निर्णय घेणे, पात्र लाभार्थ्यांना कार्यादेश देणे, झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शासन निर्णय तपासून नाहरकत प्रमाणपत्र देणे, वाढीव अनुदानासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे, हद्दवाढ क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेच्या लाभासाठी नमुना नंबर-८ अ ग्राह्य धरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. सर्व मागण्या मान्य झाल्याने आंदोलन समाप्त करत असल्याचे घोषित करत असल्याचे श्री. दामोदर म्हणाले. 
 
हद्दवाढ लाभार्थ्यांसाठी मुक्काम इशारा 
दरम्यान, येत्या १५ दिवसांत हद्दवाढ लाभार्थ्यांना लाभ न दिल्यास लाभार्थी महापालिकेच्या आवारात बेमुदत मुक्काम ठोकतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे