
देशासह राज्यात ठिकठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत होती. आत्तापर्यंत बर्ड फ्लूचा धोका नसल्याने दिलासा होता. दरम्यान, मेहेरगाव (ता.धुळे) येथील गट क्रमांक ३७६ येथे बर्ड फ्लू आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
धुळे : मेहेरगाव (ता.धुळे) येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजय यादव यांनी मेहेरगाव येथील संबंधित ठिकाणचा दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना, कार्यवाहीचा आदेशही श्री. यादव यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.
देशासह राज्यात ठिकठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत होती. आत्तापर्यंत बर्ड फ्लूचा धोका नसल्याने दिलासा होता. दरम्यान, मेहेरगाव (ता.धुळे) येथील गट क्रमांक ३७६ येथे बर्ड फ्लू आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. यादव यांनी बर्ड फ्लूचा प्रसार जिल्ह्यात अन्य ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेता बर्ड फ्लूचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
शीघ्र कृती पथक नियुक्त
मेहेरगाव (ता.धुळे) येथील गट क्रमांक ३७६ पासून किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शीघ्र कृती पथकास (रॅपिड रिस्पॉन्स टिम) आदेशित केल आहे.
तीन महिने प्रतिबंध
सदर परिसर, कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करून दहा किलोमीटर त्रिज्या असलेल्या परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा/प्रदर्शने आयोजित करण्यास पुढील ९० दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दहा किलोमीटर परिसरातील गावातील आवागमन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आदेशात म्हटले आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी निश्चित केलेल्या जबाबदारीप्रमाणे कार्यवाही करावी, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही आदेशात नमूद केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे