
कामानिमित्त बाहेर गावाला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर घराचे दार उघडे दिसले. त्यांनी घरात घुसून बघितले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी साक्री पोलिसांना माहिती दिली.
साक्री (धुळे) : शहरातील प्रगती कॉलनी येथे राहणारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या घरी चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा तोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने कॉलनी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रगती कॉलनी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी भाडेतत्त्वावर घर घेतले आहे. ते कामानिमित्त बाहेर गावाला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर घराचे दार उघडे दिसले. त्यांनी घरात घुसून बघितले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी साक्री पोलिसांना माहिती दिली.
दागिने व रोख रक्कम लंपास
१३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात असलेल्या सोन्या - चांदीचे वस्तू तसेच रोख रक्कम लंपास केली आहे. घरातील कपाट, पलंग आणि घराच्या पडदीवर ठेवलेल्या बॅगा खाली उतरवून त्यामधील वस्तूंची फेकाफेक केल्याचे दिसून आले. उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांच्या घरी चोरीची झाल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग दाखवला. कपाट आणि काही ठिकाणाहून हाताचे ठसे घेतले आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे