esakal | नववर्षात साक्री तालुका कोरोनामुक्तीकडे; उपचारासाठी बोटावर मोजण्याइतकेच रूग्‍ण  
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सरत्या वर्षासोबत या संसर्गाचे रुग्णही घटले असून, आत्तापर्यंत तालुक्यातील ९७ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या केवळ १२ रुग्ण उपचार घेत असल्याने नवीन वर्षात लवकरात लवकर तालुका कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. 

नववर्षात साक्री तालुका कोरोनामुक्तीकडे; उपचारासाठी बोटावर मोजण्याइतकेच रूग्‍ण  

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : सरत्या २०२० या वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात आरोग्य व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. या विषाणूचा संसर्ग चीनपासून ते थेट राज्यातील खेडोपाड्यापर्यंत पोचला होता. धुळे जिल्ह्यात, तर कोरोनाचा पहिला रुग्ण १० एप्रिलला साक्री शहरात आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र सरत्या वर्षासोबत या संसर्गाचे रुग्णही घटले असून, आत्तापर्यंत तालुक्यातील ९७ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या केवळ १२ रुग्ण उपचार घेत असल्याने नवीन वर्षात लवकरात लवकर तालुका कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. 

कोविड सेंटर रिकामे 
जिल्ह्यात सर्वप्रथम तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागासह संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र तरीही विविध कारणांनी संसर्ग वाढत जाऊन तालुक्यात एक हजार ४१५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातील ३१ रुग्णांना जीव गमवावा लागला, तर आत्तापर्यंत एक हजार ३७२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या केवळ १२ बाधित रुग्ण शिल्लक असून, या १२ रुग्णांपैकी लक्षण असणाऱ्या तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक-दोघे खासगी रुग्णालयात दाखल आहेत. अन्य लक्षण नसणारे रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. सध्या भाडणे येथील कोविड केअर सेंटर येथे एकही रुग्ण दाखल नसल्याने सेंटर रिकामे असून, ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे. 

८७ गावांमध्ये रुग्ण नाही 
साक्री तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र यातही सर्वांनीच खबरदारी बाळगत प्रशासनास सहकार्य केल्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणेला आत्तापर्यंत यश आले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील २२७ गावांपैकी ८७ गावांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. तसेच जे रुग्ण आढळले, त्यात मृत्युदर नियंत्रणात राहतानाच, रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट समाधानकारक राहिला आहे. यामुळे नवीन वर्षात या संसर्गापासून तालुक्याला लवकरच मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. 
 
रिकव्हरी समाधानकारक असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क राहूनच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे असून, मास्क, सॅनिटाइझरचा नियमित उपयोग करतानाच अनावश्यक गर्दी टाळण्याची गरज आहे. 
-डॉ. आशुतोष साळुंखे, तालुका आरोग्याधिकारी, साक्री  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image