
पदावरून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पेन्शन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय धुळे येथे सादर करण्यासाठी आणि प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी केली.
धुळे : तीन हजाराची लाच स्वीकारताना पिंजारझाडी (ता. साक्री) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचखोर मुख्याध्यापकाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंजारझाडी (ता. साक्री) येथील तक्रारदाराचे वडील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिपाई आहेत. ते पदावरून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पेन्शन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय धुळे येथे सादर करण्यासाठी आणि प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक गुलाब नथ्थू पिंजरी (वय ५५) यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार पथकाने महाविद्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक पिंजारी यास पथकाने ताब्यात घेतले.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक, मनजितसिंग चव्हाण, संदीप सरग, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर आदींनी ही कारवाई केली.
संपादन ः राजेश सोनवणे