कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव

साक्री (धुळे) : खडू- फळा, पेन, पुस्तक आदी शस्त्रांच्या साहाय्याने बालकांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी लढणारे.. माणुसकीची ज्योत ह्रदयात तेवत ठेवणारे.. माणुसकीच्या शत्रूसंगे मूल्य संस्कारांच्या जोरावर युद्ध सुरू ठेवणारे.. तालुक्यातील सुमारे ३१ शिक्षक- शिक्षकेतर (School teacher) कर्मचारींना कोविड- १९ च्या रणसंग्रामात लढताना अपयश पदरी आल्यामुळे जीव गमवावा (Corona death) लागला आहे. पश्चात असलेल्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी जन माणसासह नियतीने आता धीर द्यावा. अंधार लोटणाऱ्यांच्या कुटुंबातील अंधकार दूर व्हावा अशी भावना सर्वसामान्य शिक्षणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. (school teacher death in coronavirus last one year)

देश आणि राज्य पातळीवर आलेले कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस गडद होत गेले याचा फटका सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, आरोग्य आदींसह शिक्षणक्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य आणि देश पातळीवर सर्वच स्तरातून जबाबदारपणे प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र हे प्रयत्न अनेक बेजबाबदार नागरिकांच्या बेताल वागण्यामुळे काहीअंशी अपयशी होतानाचेही चित्र सर्वसामान्य नागरिकांना अनुभवास येत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य आणि पोलिस प्रशासनासह शिक्षणक्षेत्रातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी देखील आपले योगदान निःसंकोचपणे देत आहेत.

हेही वाचा: जिवाशी खेळ सुरूच..खासगी बसमधून प्रवाशी वाहतूक सुरूच

साडेतीन हजार शिक्षकांना लागण

हे योगदान देणाऱ्या तालुक्यातील शासकीय अनुदानित १४, जिल्हा परिषदेच्या ४४५, खाजगी अनुदानित १४५, खाजगी विनाअनुदानित ०८, स्वयं अर्थसहाय्यीत ३४ अशा एकूण ६४६ शाळांमधील सुमारे ३४७३ शिक्षक आणि ८०० च्या जवळपास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३९६ जणांना मार्च २०२० ते मे २०२१ दरम्यान कोरोनाची लागण झाली. यातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील १७३, खाजगी अनुदानित शाळेमधील १७८, आश्रम शाळेतील १३, स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील ०१ अशा सुमारे ३६५ जण आजाराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले. तर जिल्हा परिषदेच्या शाळांतील १३, खाजगी अनुदानित शाळांमधील १६, आश्रम शाळांतील ०२ अशा सुमारे ३१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अद्यापही कोरोना विरोधात जीवन संघर्ष करीत आहेत.

कुटुंबीयांच्या दुःखावर सानुग्रहाची चादर..

कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले होते. त्‍या नुसार हे आदेश ३० सप्‍टेंबर २०२० पर्यंत लागू होते. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र महाराष्ट्र राज्यात सद्यःस्थितीत कोविड-१९ साथीची परिस्थिती विचारात घेता हा शासन निर्णयास १ जानेवारी २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ जीव गमावलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

loading image
go to top