esakal | शिक्षकांची नोकरी धोक्यात..काय आहे कारण वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

वेळेवर संच मान्यतेची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे, अन्यथा बहुतांश शिक्षक अडचणीत (अतिरिक्त) येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिक्षकांची नोकरी धोक्यात..काय आहे कारण वाचा 

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर (धुळे) : राज्यातील सर्व विभाग, व्यवस्थापन माध्यमांच्या शाळेतील २०२०- २१ शैक्षणिक वर्षात स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणीकृत विद्यार्थी संख्या शिक्षकांची पदे संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड स्टुडंट पोर्टलवर नोंदविले जाणार नाही, त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संचमान्यतेसाठी वगळले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वेळेवर संच मान्यतेची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे, अन्यथा बहुतांश शिक्षक अडचणीत (अतिरिक्त) येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शंभर टक्‍के आधार नोंदणी आवश्‍यक
संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्यभरातील शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक अपडेटसाठी सरसावले आहेत. मार्च २०२१ अखेर शंभर टक्के आधार नोंदणी होणे आवश्यक आहे. बोगस व खरी पटसंख्येची पडताळणी निदर्शनास येणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली होती. मात्र, अनेक शाळा नोंदणीचे काम करू शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता मार्चअखेर नोंदणी पूर्ण करण्याची तंबी शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकांची पदे निश्चित करताना फक्त आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. महिनाअखेरीस आढावा घेऊन शासनास सादर करण्याच्या सूचना उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिल्या आहेत. 

शिक्षकांना हे करावेच लागणार
शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने सरल संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे राज्यभरातील संस्थाचालक, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा डाटा बेस (सर्वंकष माहिती) एका क्लीकवर उपलब्ध होईल. यापूर्वीच सर्व्हर डाउनमुळे शाळांना माहिती अद्ययावत करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शिक्षण विभागास शैक्षणिक प्रशासकीय नियोजनासाठी सांख्यिकीय माहितीची गरज असते. प्रशासकीय स्तरांवरून ही माहिती शाळांकडून संकलित केली जाते. कागदपत्रांच्या स्वरूपात माहिती सादर करावी लागत आहे. शिक्षकांचा अध्ययनाव्यतिरिक्त बराच वेळ या कामांवर खर्च होतो. त्यामुळे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘सरल : सिस्टिमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफोर्मस फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट’ या संगणक प्रणालीद्वारे शिक्षण संस्था, शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची एकत्रित माहिती संकलित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. या माहितीच्या आधारे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे प्रभावी नियोजन करणे आर्थिक तरतुदीचे नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. शाळा संचमान्यतेची प्रक्रिया ‘एनआयसी’तर्फे जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे होते. 

पालकांचे सहकार्य गरजेचे 
पटसंख्या कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या पदसंख्येवर होणार आहे. आता शिक्षकांनी गाफिल राहू नये. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. अद्यापही अनेक पालक कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्या विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी घेताना अडचणी येत आहेत. यासाठी शिक्षकांना पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे 

loading image