
भाजपच्यावतीने रस्ता मंजुरीसाठी आमदार रावल यांना निवेदन देऊन या रस्त्यांच्या कामांची मागणी करण्यात आली आहे.
शिंदखेडा (धुळे) : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारे हे रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्थेत आहेत हे रस्ते आजही जैसेथे अवस्थेत आहेत. हे रस्ते काँक्रेटिकरण करून नवीन तयार व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. या मागणीकडे लोकप्रतिनिधी केवळ आश्र्वासन देण्यापलीकडे काहीही केलेले नाही.
शहरातील मध्यवर्ती भागातून जाणारा भगवा चौक ते नदीपात्र, निरंजन कॉम्प्लेक्स ते गणेश कॉलनी जुना चौगाव रस्ता हे रस्ते आहेत. रस्ते अतिशय खराब झाले असून यांचे नवीन काम करण्यात यावे. यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी व कॉलनी वासियांनी निवेदन दिले आहेत. नुकतेच सोशल मीडियावरून या रस्त्यावरून शहरात श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू झाली आहे.
भाजपचे आमदार रावल यांना निवेदन
भाजपच्यावतीने रस्ता मंजुरीसाठी आमदार रावल यांना निवेदन देऊन या रस्त्यांच्या कामांची मागणी करण्यात आली आहे. आमदार रावल यांच्या कल्पनेतून बुराई नदी वरील नवीन पूलामुळे भगवा चौकापासून या रस्त्याने धुळे, चिरणे, कदाने, महाळपुर, बाबुळदे, खलाने, वायपुर असे गावांसह जाधव नगर, माळीवाडा, जनता नगर व रज्जाक नगर- नदीपार भिलाटी या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. भगवा चौक ते नदी पात्र हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असून हा रस्ता नवीन करण्यात यावा तसेच स्टेशन रोड लगत निरंजन कॉम्प्लेक्स (जुना चौगाव रस्ता) ते गणेश कॉलनीपर्यंत हा रस्ता देखील जिल्हा परिषद अंतर्गत असून हा रस्ता नवीन करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार रावल यांनी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम याना आदेश देत लवकरात लवकर रस्त्याचे काम जिल्हा परिषद अंतर्गत करण्याचे आदेश दिले. या वेळेस नगरपंचायतीचे नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह उपनगराध्यक्ष भिला पाटील, नगरसेवक प्रकाश देसले, जितेंद्र जाधव, विनोद पाटील, अर्जुन भिल, माजी नगरसेवक राहुल कचवे व भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण माळी ,कल्पेश अहिरे व गिरीश चौधरी हे उपस्थित होते.
काँग्रेसचा मंत्री थोरातांकडे पाठपुरावा
येथील विरोधी पक्षातील नगरसेवक व काँग्रेस पदाधिकारी यांनी या रस्ते कामा संदर्भात काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यामार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे रस्ते कामा संदर्भात मागणी केली. मंत्री थोरात यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला व पत्राची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केले. शिंदखेडा शहरात जनता हायस्कूल ते भटु पाटील (जुना चौगाव रस्ता) यांचा घरापर्यंत (६० लक्ष), भगवा चौक ते नवीन पुला पर्यंत (६० लक्ष) शहरात विविध विकास कामांची मागणी करण्यात आली. त्याची तात्काळ दखल घेत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. वॉर्ड क्र. २, ३, ५, ८, ९, १३ मधील विकास कामांसाठी नगरविकास विभागालाही मागणी केली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरपंचायतीचे विरोधीपक्ष नेते सुनील चौधरी उपनगराध्यक्ष दीपक देसले, नगरसेवक दीपक आहिरे, उदय देसले, दिनेश माळी, संगिता सोनवणे, संगिता थोरात, मीराबाई पाटील, शिंदखेडा शहराती ॲड. वसंतराव भामरे. के. आर. पाटील. सताळीस आबा, प्रा. दीपक माळी. शरद पाटील, किरण जाधव. गणेश खलाणे. अनिल माळी सर्व समता परिषदेचे पदाधिकारी यांनी केले आहे.
पाठपुरावा कोणीही करा पण रस्ते करा
रस्त्यांच्या मागणीच्या निवेदन व पाठपुरावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून श्रेय घेण्यावरून चढाओढ होत असून शहरात चर्चा सुरू आहे. निवेदनातून मागणी व पाठपुरावा कोणीही करा पण शिंदखेडा शहरातील धुळ खात असलेले रस्ते लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे अशी अपेक्षा शहर वासियांना आहे.
संपादन ः राजेश सोनवणे