शेतातून ट्रॅक्‍टर नेले म्‍हणून घडली दंगल; दोन्‍ही गटांकडून परस्‍परविरोधी गुन्हे 

सचिन पाटील
Friday, 22 January 2021

वरवाडे येथील नितीन माळी (वय ३१, रा. वरवाडे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी शेतातून ट्रॅक्टर नेल्याचा राग आल्याने संशयितांनी गुरुवारी (ता.२१) सकाळी लोखंडी सळई घेऊन त्याच्यासह आई, वडील, भाऊ यांना बेदम मारहाण केली.

शिरपूर (धुळे) : शेतातून ट्रॅक्टर चालवून नेल्याच्या वादातून दोन गटांत दंगल उसळल्याची घटना शहरातील वरवाडे येथे घडली. दोन्ही गटांकडून परस्परविरोधातील फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

वरवाडे येथील नितीन माळी (वय ३१, रा. वरवाडे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी शेतातून ट्रॅक्टर नेल्याचा राग आल्याने संशयितांनी गुरुवारी (ता.२१) सकाळी लोखंडी सळई घेऊन त्याच्यासह आई, वडील, भाऊ यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची सोन्याची साखळी काढून घेतली. यामुळे संशयित मनोज माळी, गोलू माळी, बाळा माळी व त्याचा लहान भाऊ, राजू माळी, संजय माळी, देवकाबाई माळी, गंगाबाई माळी, सुनंदा माळी, संजय माळी यांचा मुलगा (सर्व रा. वरवाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर सुनंदाबाई माळी (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नितीन माळी, संतोष माळी, सिंधूबाई माळी, भय्या माळी, शिवाजी माळी, निंबाबाई माळी, पिंटू माळी, संतोष माळी यांचा जावई, दत्तू माळी (सर्व रा. वरवाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 

मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मारहाण 
मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (ता.२१) सायंकाळी साडेसहाला अहिल्यापूर (ता. शिरपूर) येथे घडली. थाळनेर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. बाळासाहेब बिऱ्हाडे (वय ६४) यांच्या मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून मंगला थोरात, मिलिंद थोरात, राकेश थोरात, धनराज जावळे, उत्तम जावळे, शालू थोरात (सर्व रा. अहिल्यापूर) यांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत लताबाई बिऱ्हाडे, तेजस्विनी बिऱ्हाडे व राजेश्वरी बिऱ्हाडे जखमी झाले. 

नदीपात्रात आढळला वृद्धाचा मृतदेह 
अहमदाबाद (गुजरात) येथे जाण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा मृतदेह बाभुळदे (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात आढळला. दगा रामदास माळी (वय ७०, रा. पानसेमल जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. १४ जानेवारीला ते अहमदाबाद येथे जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. मात्र तेथे न पोचल्याने त्यांचा परिसरात शोध सुरू होता. गुरुवारी (ता.२१) दुपारी बाराला त्यांचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpur crime news rarm tractor and riot in two groups