esakal | खेळत बोरं तोडली..पण वाटा पाडण्यावरचा वाद टोकाला; डोक्‍यात दगड घालून खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दोघे सोबत खेळले. संशयिताने त्याला खाण्यासाठी बिस्किटेही दिली. त्यानंतर दोघांनी झाडावरुन बोरे पाडली. त्यातील वाटा घेण्यावरुन दोघांत वाद झाला. मोहितने संशयिताला दगड फेकून मारला. प्रत्युत्तरात संशयितानेही दगड फेकला. तो लागल्याने मोहितचे डोके फुटून रक्त वाहू लागले. त्याने घरी तक्रार करण्याची धमकी दिली.

खेळत बोरं तोडली..पण वाटा पाडण्यावरचा वाद टोकाला; डोक्‍यात दगड घालून खून

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : बोरांचा वाटा पाडण्यावरुन झालेल्या भांडणात सहा वर्षीय बालकाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
अंतुर्ली (ता. शिरपूर) येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सदर घटना घडली. मोहित दिनेश ईशी (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे. आई ज्योती ईशी त्याला घेऊन भिमराव ईशी यांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. सकाळी अकराला संशयीत 13 वर्षीय मुलगा तेथे येऊन मोहितला बोरे तोडण्यासाठी सोबत घेऊन गेला. दुपारी बारापर्यंत संशयीताला त्याच्या शेतात मोहितसोबत खेळतांना ज्योतीने पाहिले. पाऊणला संशयीत ज्योतीकडे आला. लाल शर्ट व काळी पँट घातलेल्या माणसासोबत मोहित निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. तो कुठे गेला अशी विचारणा केल्यावर त्याने तऱ्हाडी (ता. शिरपूर) गावाच्या दिशेने संबंधित व्यक्ती मोहितसोबत गेल्याचे सांगितले. त्या परिसरासह घरी व गावात शोध घेऊनही करुनही मोहितचा पत्ता लागला नाही. शोध सुरु असतांना सायंकाळी पाचला मोहितचा मृतदेह गावातील दुर्योधन ईशी यांच्या शेतात पडल्याचे आढळून आले. दगडाने डोके ठेचून त्याचा खून झाल्याचे दिसून आले. खुनाबाबत माहिती मिळताच डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक किरण बार्‍हे, सोनवणे, हवालदार गुलाब ठाकरे, अनिल शिरसाठ, ललित पाटील, दिनेश माळी, रविंद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, उमेश पाटील, स्वप्निल बांगर यांच्यासह फोरेन्सिक पथक, एलसीबीचे पथक व श्वानपथक पोहचले. श्वानाने गावापर्यंतचा मार्ग दाखवला. त्यामुळे संशयित गावातीलच असल्याच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. 

आणि धागा गवसला
घटना घडतेवेळी तेथे उपस्थितांपैकी संशयिताने मोहित लाल शर्ट व काळी पँट घातलेल्या व्यक्तीसोबत गेल्याची माहिती दिली होती. तिची खातरजमा केली असता अशी व्यक्ती पाहिलीच नसल्याचे बहुतांश लोकांनी सांगितले. माहितीतील ही तफावत पाहून पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने आपल्याकडून मोहितचा खून झाल्याची कबुली दिली. 

बोराचा वाटा आणि काढला काटा
संशयित मोहितला घेऊन गेला, दोघे सोबत खेळले. संशयिताने त्याला खाण्यासाठी बिस्किटेही दिली. त्यानंतर दोघांनी झाडावरुन बोरे पाडली. त्यातील वाटा घेण्यावरुन दोघांत वाद झाला. मोहितने संशयिताला दगड फेकून मारला. प्रत्युत्तरात संशयितानेही दगड फेकला. तो लागल्याने मोहितचे डोके फुटून रक्त वाहू लागले. त्याने घरी तक्रार करण्याची धमकी दिली. वडिलांचा रागीट स्वभाव असल्याने त्यांच्याकडून शिक्षा होण्याच्या भीतीने संशयिताने मोठा दगड उचलून मोहितच्या डोक्यात चार- पाचदा घातला; त्याचा गळाही दाबला. वर्मी घाव लागल्याने मोहित जागीच मरण पावला. त्याचा मृतदेह उंच गवतात पडला होता. मोहितच्या आईने त्याला शोधण्यासाठी येवू नये; म्हणून संशयिताने तो अनोळखी व्यक्तीसोबत निघून गेल्याचा बनाव रचला. 

रक्ताचे डाग धुतले 
संशयिताच्या शर्टवर मोहितच्या रक्ताचे डाग पडले होते. खून केल्यानंतर संशयित पुन्हा शेतात पाणी भरण्यासाठी निघून गेला. त्या पाण्याने त्याने रक्ताचे डाग धुतले. पोलिसांनी ताब्यात घेईपर्यंत संशयित कमालीच्या निर्ढावलेपणाने वागत होता. प्रारंभी पोलिसांनाही चकवण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र मोहितच्या खुनामागे त्याचा हात असल्याच्या संशयावर पोलिस ठाम राहिले. 

शेजारीच ठरला काळ 
मृत मोहित आणि संशयिताची घरे अंतुर्ली गावात एकाच गल्लीत आहेत. अनेकदा दोघे एकत्र खेळत होते. त्यामुळे बुधवारी तो मोहितला घेऊन खेळण्यासाठी गेला तेव्हा असा काही प्रकार घडेल अशी कुठलीच शक्यता त्याच्या आईला वाटली नाही. दुपारीही तो मोहित बेपत्ता झाल्याबद्दल तत्परता दाखवीत माहिती देण्यासाठी त्याच्या आईकडे पोहचला. त्यामुळे पोलिसांनी बोलता करेपर्यंत त्याच्याविषयी गावात कोणालाही संशय वाटत नव्हता. मात्र हे भयंकर कृत्य उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 

संपादन ः राजेश सोनवणे