esakal | मंगलाष्‍टके आटोपली, सप्तपदीही झाली पण नंतर विधी थांबली अन्‌ वधू मोबाईल घेवून सोफ्यावर..​
sakal

बोलून बातमी शोधा

marraige bride online exam

धुमधडाक्‍यात विवाह समारंभ होत होता. लग्‍नातील पंगती देखील उठत होत्‍या. इकडे मंगलाष्‍टके होवून सप्तपदीचा विधी देखील पार पडला. पण दुपारी तीनला सर्व विधी थांबले अन् वधूने हातात मोबाईल घेतला आणि मंडपातील एका सोफ्यावर जावून बसली.‍

मंगलाष्‍टके आटोपली, सप्तपदीही झाली पण नंतर विधी थांबली अन्‌ वधू मोबाईल घेवून सोफ्यावर..​

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : मंगलाष्टके आटोपली, सप्तपदीचा विधीही पार पडला. नंतरचे विधी अचानक थांबवण्यात आले. वधूने मोबाइल हातात घेतला. लग्नाच्या मंडपातच एका बाजूला सोफ्यावर बसून तिने ऑनलाइन पेपर दिला. पेपर आटोपल्यानंतर अन्य विधी पूर्ण करण्यात आले. 

उंटावद (ता. शिरपूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य रामकृष्ण विठोबा महाजन यांची कन्या शुभांगी हिचा विवाह उंटावद येथीलच सुरेश नागो महाजन यांचा मुलगा स्वप्निल याच्याशी निश्चित केला होता. शनिवारी (ता. ३०) मुहूर्त निघाला. मात्र त्याच दिवशी शुभांगीचा बी.एस्सी (द्वितीय वर्ष) चा फिजिक्स-इलेक्ट्रॉनिक्सचा ६० गुणांचा पेपर होता. त्यामुळे विवाहाचा मागेपुढे करण्याबाबत उभयपक्षी चर्चा सुरू झाली. मात्र शुभांगीने आत्मविश्वास दाखवीत लग्नाच्या दिवशीच देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी उंटावद येथे नियोजित मुहूर्तावर विवाह समारंभ पार पडला. 

ज्‍येष्‍ठांचा आशीर्वाद घेत दिला पेपर
विवाहातील काही विधी झाल्यानंतर दुपारी तीनला वाजता पेपरची वेळ झाली. आईवडिलांसह सासरच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन शुभांगी मंडपातच एका बाजूला सोफ्यावर बसली. तासाभराचा कालावधी असलेल्या पेपरमध्ये तिने ४० प्रश्न सोडवले. पेपर दिल्यानंतर इतर विधींची पूर्तता करण्यात आली. 

अभ्‍यासात खंड नाही
साखरपुडा झाल्‍यानंतर मुले- मुली अगदी रात्री उशिरापर्यंत फोनवर इंगेज असतात. पण शुभांगी आणि तिच्या पतीने देखील साथ दिली. वेळ वाया न घालता विवाहपूर्व तयारी सुरू असतांनाही शुभांगीने अभ्यासात खंड पडू दिला नव्हता. तिच्या शिक्षणाप्रति निष्ठेचे उपस्थितांतून कौतुक करण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे