मिरवणूक काढून पोलिसांना धक्काबुक्की; दोन भावंडे ताब्यात 

रमाकांत घोडराज
Sunday, 21 February 2021

कर्मचाऱ्यांनी दोघांना मिरवणूक काढू नका, असे समजावून सांगितले. त्या वेळी विकास व गोपाल या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पाटील व श्री. चौधरी यांना धक्काबुक्की केली.

धुळे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक काढून पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या शहरातील बाहुबलीनगरमधील दोन भावंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिवजयंतीचे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. तसेच जमावबंदी आदेश असताना शहरातील साक्री रोड परिसरातील बाहुबलीनगरमध्ये पंचशील ग्रुप सम्राट, अशोक स्तंभाजवळ शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विकास गोमसाळे व गोपाल गोमसाळे (रा. बाहुबलीनगर, साक्री रोड) यांनी गर्दी जमा करून मिरवणूक काढली. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, अनिल चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दोघांना मिरवणूक काढू नका, असे समजावून सांगितले. त्या वेळी विकास व गोपाल या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पाटील व श्री. चौधरी यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी श्री. चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गोमसाळे भावंडांना ताब्यात घेतले आहे. 

अल्पवयीन मुलाला पळविले 
धुळे : नवे भदाणे (ता. धुळे) येथील अल्पवयीन मुलाला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. योगेश नाना वाघमोडे (वय १७, रा. नवे भदाणे) असे त्या मुलाचे नाव आहे. ही घटना १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान घडली. नाना काळू वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध धुळे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
 
अजनाळेत वृद्धाची आत्महत्या 
धुळे : अजनाळे (ता. धुळे) येथील वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. भानुदास रामभाऊ शिंदे (वय ६०) हे १९ फेब्रुवारीला ‘शौचाला जाऊन येतो’, असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत म्हणून शोधाशोध केली असता, त्यांनी सुती दोरीने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळले. दुपारी दोननंतर त्यांनी गळफास घेतल्याचा अंदाज आहे. लोकांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉ. दिग्विजय सूर्यवंशी यांनी त्यांना मृत घोषित केले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shivjayanti police in riot gear storm a rally