esakal | तरुणाईला ग्रासले लाईक्‍स, कमेंट्‌स अन्‌ स्टेट्सने 
sakal

बोलून बातमी शोधा

social media

साधारणतः तीन बाय सहा इंचच्या मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व, संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली तरी हल्ली असंख्यजण त्यातच आकंठ बुडाल्याचे चित्र आहे.

तरुणाईला ग्रासले लाईक्‍स, कमेंट्‌स अन्‌ स्टेट्सने 

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (धुळे) : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दूरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंट, व्ह्युव्हज, स्टेट्स, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह उज्ज्वल भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत. 

साधारणतः तीन बाय सहा इंचच्या मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व, संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली तरी हल्ली असंख्यजण त्यातच आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. ही बाब मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या मोबाईल वापरकर्ते रुग्णांच्या संध्येवरून दिसून येते. बहुतांश युजर्संचा सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल दिसतो. 

कमी लाईक्‍सने निराशा
ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणीची गरज असते. त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशीलता क्षीण होण्याची भिती सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे वाढते. कमी लाईक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या, तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपणा, निराशा असे परिणाम वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 
 
इंन्स्ट्राग्राम की फेसबुक या सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली तरुणाई विविध व्हिडिओ, सेल्फी अपलोड करीत आहेत. धोक्‍याच्या स्थळी जाऊन जीव आणखीनच धोक्‍यात घालून व्हिडिओ कॉलिंग, स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. व्हिडिओ चित्रण करून अपलोड ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त प्रसिद्ध होऊ अशी भावनाही युजर्संची आहे. या आभासी जगातही काहीजणांचे जीव गेल्याचे उदाहरणे आहेत तरी तरुणांना प्रसिद्धीसाठी असे स्टंट करू नये. 
- हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक, शिरपुर 
 
र्व्हच्युअल लाईफमुळे फसवणूक, आर्थिक नुकसान, विश्‍वासघात, चिडचिड, ताणतणाव, चिंता, एकलकोंडेपणा, निराशेत भर पडत असून वैचारिक क्षमता क्षीण होत असून समंजसपणाचाही अभाव जाणवत आहे. भविष्य अधांतरी होण्याची शक्‍यता वाढते. र्व्हच्युअल लाईफपेक्षा सोशल लाईफ जगण्याची गरज आहे. स्वमग्न नव्हे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.तरुणांनी मोबाईल मधील गेम्सपेक्षा मैदानी खेळ खेळावे. 
- प्रा. डॉ. दिलवसिंग गिरासे, तऱ्हाडी. ता शिरपुर 
 
माणसांचा माणसांशी प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. परिणामी, व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढत आहे. सोशल मीडियात वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्‍स, कमेंट, व्ह्युव्हज या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. आनंद म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी असाच समज वाढत आहे. त्यातून व्यक्ती स्वत:च स्वतःचे आभासी विश्‍व तयार करून त्यात रममान होताना दिसून येत आहे. 
- डॉ. मोहन पाटील, साई क्लिनीक. तऱ्हाडी 

सोशल मीडियाचा वापर करताना युजर्स बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी ऊर्जा खर्च करीत आहेत. शासनाने २०१९ मध्ये १३-६१ वयातील १२ हजार विद्यार्थ्यांवर अभ्यास केला होता, तीन विद्यार्थी पैक्की दोन तरी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर चांगले दिसण्यासाठी दडपण येते, त्यातून अतार्किक विचारांना खतपाणी मिळते. उदासीनता, नैराश्‍य, चिंता वाढते. सोशल मीडियांवर इतरांच्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक्‍स, कमेंट आणि व्हुव्हजशी आपण केलेल्या पोस्टशी तुलना करतो. त्यातून उदासीनता वाढते. 
- डॉ. प्रतापराव पवार, मनोविकार तज्‍ज्ञ, प्राथमिक आरोग्य केंद्र, विखरण, ता. शिरपूर 

संपादन ः राजेश सोनवणे