
वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळ उद्ध्वस्त; काढलेला कांदा सांभाळण्याचे संकट
नेर (धुळे) : दोन दिवसापूर्वी नेर येथे सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे येथील शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली. या नुकसानग्रस्त वादळामुळे भदाणे शिवारातील गण्यादेव येथे शेतकरी गणेश मोतीराम माळी (खलाणे) यांची पन्नास फुटी चाळ नवीन तयार केलेली होती. त्यात दिवसभर कांदा भरला होता. परंतु सायंकाळी आलेल्या वादळामुळे चाळीची जाळी आणि ताडपत्री उडून गेली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतातील पिकविलेला कांदा दिवसभर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मजूर लावून भदाणे शिवारात कांदा चाळ असलेल्या ठिकाणी वाहतूक केला होता. त्याच दिवशी दिवसभर कष्ट करून तेथील संपूर्ण कांदा हा चाळीत साठवणुकीसाठी भरून ठेवला. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत मोठा खर्च लागल्यामुळे सध्या कांद्याला खर्चापेक्षा कमी भाव असल्याने कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. या अनुषंगाने थोड्या दिवसात कांद्याला थोड्या प्रमाणात भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी गणेश माळी यांनी या कांद्याची साठवणूक केली होती. परंतु त्याच दिवशी सायंकाळी मात्र निसर्गाने फार मोठी थट्टा केली. यामुळे गणेश माळी यांचे फार मोठे नुकसान झाले.
कांदाही बाहेर उडाला
वादळी वारा जोराचा असल्यामुळे नवीन बांधलेली कांदा चाळ यावरील ताडपत्री तसेच चाळीला बसविलेले लोखंडी अँगल, जाळी हे सर्व वादळामुळे उडून गेल्याने चाळीत भरलेला कांदा हा संपूर्ण बाहेर फेकला गेला. चाळ भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च, मजुरी लागली होती परंतु वादळी वाऱ्यामुळे तेथील शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले. यासाठी शेतकरी गणेश माळी यांनी प्रशासनाला विनंती करून येथील तलाठी यांनी तात्काळ झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली आहे.
Web Title: Marathi Dhule News Strong Winds The Onion Hut Was
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..