esakal | ६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा ‘खावटी’साठी सर्व्हे 
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Exclusive

सर्व्हेतील माहिती अपडेटसाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनानुसार रोज सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी रात्रंदिवस कामकाजात व्यस्त आहेत.

६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा ‘खावटी’साठी सर्व्हे 

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर (धुळे) : राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला सहाय्यासाठी खावटी अनुदान योजना (२०२० -२१) एका वर्षासाठी सुरू केली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ६७ हजार लाभार्थी कुटुंबांचा खावटी अनुदानाचा सर्व्हे नुकताच झाला आहे. पोर्टलवर ७० हजार अनुसूचित जमाती कुटुंबांच्या सर्व्हेचा लक्षांक होता. पैकी तीन हजार कुटुंब बाहेरगावी रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने या कुटुंबांशी संपर्क प्रकल्प कार्यालयातर्फे सुरू आहे. 
सर्व्हेतील माहिती अपडेटसाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनानुसार रोज सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी रात्रंदिवस कामकाजात व्यस्त आहेत. आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गावात प्रत्यक्षात जाऊन माहिती जाणून अर्ज भरून घेतले. मात्र सर्व्हेतील अर्जाची माहिती पडताळणी व अपडेटसाठी शासनस्तरावरील सूचनेनुसार तीन ते चार वेळा संबंधित कुटुंबाकडे पुन्हा जावे लागले. त्यामुळे कर्मचारी व कुटुंबप्रमुख यांच्यात वाद निर्माण झाला. एकाच वेळी माहिती घ्या. असे लाभार्थी कुटुंबाकडून सांगण्यात आले. 

कर्मचारी काम पुर्ण करण्यात 
शासनस्तरावरून वेळोवेळी सूचनांचा बदल होत असल्याने थेट कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. प्रकल्प कार्यालयात सुटीच्या दिवशीही खावटी अनुदानाचे कामकाज सुरू आहे. समन्वय अधिकारी आकडेवारीत व्यस्त आहेत. ज्या कुटुंबाकडे जातीचे प्रमाणपत्र (दाखले) आहेत. त्यांची नोंदणी महाडिबिटी वेबसाइटवर एडिट ऑप्शनद्वारे लाभार्थ्यांची माहिती अचूक आश्रमशाळेतील कर्मचारी पूर्ण करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल आदिवासी विकास विभागाचे सचिवांना व्हिसीने दिला जात आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. के. ठाकरे, बी. ए. आव्हाड, शिक्षण विस्ताराधिकारी अविनाश पाटील, एस. एस. काकड दैनंदिन ऑनलाइन माहिती अद्ययावत लक्ष ठेवून आहेत. चार हजार रुपये ऑनलाइन खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी माहिती अचूक अपडेट केली जात आहे. असे समजते. 
 
धुळे प्रकल्प कार्यालय खावटी कर्ज योजना 
ऑनलाइन कुटुंब डाटा एन्ट्री संख्या तालुकानिहाय 
धुळे :१३५२६, साक्री : २३२६०, शिरपूर : २१९५३, शिंदखेडा : ७६६५, एकूण ६६ हजार ४२४. 

राज्यातील खावटी अनुदान लाभार्थी कुटुंब संख्या 
एक एप्रिल २०१९ ते ३१मार्च २०२० कालावधीतील मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर : चार लाख, आदिम जमातीची सर्व कुटुंबे : दोन लाख २६ हजार, पारधी जमातीची सर्व कुटुंबे : ६४ हजार. गरजू आदिवासी कुटुंबे : ३लाख वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे : १ लाख ६५हजार. 
एकूण : ११ लाख ५५ हजार. 
 
ज्या लाभार्थ्यांचे जातीचे दाखले, आधार क्रमांक अपलोड करणे बाकी आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. समन्वय अधिकारांच्या माध्यमातून कामकाज प्रगतिपथावर आहे. 
- राजाराम हाळपे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image